माधुरी पेठकर
३५ म्हणजे उमेदीचे वय. तारुण्यही सरलेले नसते. त्या वयात कोणी आजी झालं तर?
शिर्ली लिंग ही ३५ वर्षांची सिंगापूरची महिला. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर. तिने तीन लग्न केले. पाच मुलांची आई. एक यशस्वी व्यावसायिक. ती सिंगापूरमध्ये एक रेस्टॉरंट चालवते. शिर्लीची आज जगभरात चर्चा होते आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं आजीपण. वयाच्या ३५ व्या वर्षी शिर्ली आजी झाली आहे. तिच्या फक्त १७ वर्षांच्या मोठ्या मुलाला बाळ झालं. एवढ्या लहान वयात आपला मुलगा बाप झाला म्हणून शिर्ली चिडली नाही, संतापली नाही. तिला स्वत:लाही कमी वयातच मुलं झाली होती. कमी वयात मूल झाल्यावर कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, याचा शिर्लीला अनुभव आहे.
आपल्या मुलांच्या बाबतीत हे होऊ नये, अशी तिची अपेक्षा होती. पण आता मुलाला मूल झालं म्हटल्यावर शिर्ली एक समजूतदार आईच्या भूमिकेत शिरली.
बाप झालेल्या आपल्या मुलाने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात, असं शिर्लीला वाटतं. उलट त्याने आपले वडीलपण योग्यरीतीने निभवावे यासाठी त्याला खंबीर करणे ही आपली जबाबदारी असल्याचे शिर्ली सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे सांगते आहे.
शिर्लीची आजी झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबरोबर त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली. शिर्लीला अनेकांनी एक अयशस्वी आई म्हणून हिणवलं.
मुलाला चांगलं शिक्षण देऊन मोठं करायचं सोडून लहान, अपरिपक्व वयात मुलगा बाप झाला, यावर टीका झाली. तर आपल्या मुलाबाबत शिर्लीने इतका मोकळेपणा दाखविला, याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं.
वाद तर झालाच, पण आजच्या आधुनिक जगातली ही चर्चा, विषय आहे गंभीरच.