Join us  

जादुई आवाजाने यू ट्यूब गाजविणारी गोड गळ्याची सोनाली सोनवणे, ती आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 3:04 PM

'जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग, तळहाती इंद्रधनू सप्तरंग...' असं म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम तरूणाईला डोलवणारी गोड गळ्याची सोनाली तशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सोनाली ते गायिका सोनाली हा तिचा प्रवासही भलताच भन्नाट आहे.

ठळक मुद्देसोनालीचं जवळपास प्रत्येक गाणं आज ट्रेंडिंग होतं. आधी ती टिकटॉकवर शेअर करायची. आता इन्स्टाग्राम आणि यु ट्यूबवर तिच्या गाण्यांची अक्षरश: धूम सुरु असते.

सोनाली सोनवणे हे नाव आता काही सोशल मिडियाला नवं नाही. तिची गाणी, तिचा आवाज आता जबरदस्त हिट झाला असून तरूणाईमध्ये तर तिची प्रचंड क्रेझ आहे. सोनालीचं गाणं आलं, असं समजताच तिचे चाहते ते गाणं आवर्जून ऐकतातंच पण, त्यासोबतच तिच्या गाण्यांवर अनेक रिल्सदेखील तयार होतात. सोनालीचं गाण स्टेटस म्हणून ठेवणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. तिचं नवं गाणं येताच त्याच्यावर लाईक्सचा अक्षरश: वर्षाव होतो. यु ट्यूबवर प्रत्येक गाण्यालाच मिलीयन्स लाईक्स आणि व्ह्यूज मिळविणारी ही सोनाली नेमकी आहे तरी कोण? याची उत्सूकता तिच्या अनेक चाहत्यांना आहे. 

 

सर्वसामान्य मराठी घरातली मुलगी जशी असते, अगदी तशीच आहे सोनाली. सोनालीचं गाणं कसं सुरू झालं, याविषयी सांगताना सोनाली म्हणाली की तिची आई आणि मामा हे दोघेही छान गातात. त्यांच्याकडूनच तिला गाण्याचा वारसा मिळाला आहे. लहानपणी एकदा शाळेत राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा होती. या स्पर्धेत सोनालीने मामाच्या सल्ल्याने 'ए मेरे वतन के लोगो' गाणं हे गाणं गायलं होते. सोनालीने पहिल्यांदाच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच स्पर्धेत पहिलं बक्षिस पटकावलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं काहीसं झालं आणि हे गाणं ऐकून शिक्षकांनी सोनालीच्या आई- वडिलांना शाळेत बोलवून त्यांना सोनालीला शास्त्रीय गायन शिकविण्याचा सल्ला दिला. इथून खऱ्या अर्थाने सोनालीचा गायन क्षेत्रात प्रवेश झाला.

 

सोनाली सांगते, प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जसा संघर्ष करावा लागतो, तसा मलादेखील करावा लागला. मी चांगलं गाणं गाते म्हणून मला अनेक जणांकडून जेलसी अनुभवावी लागली. अनेक स्पर्धांमध्ये तर चांगलं गाणं गाऊनही मला बक्षिस मिळालं नाही. असे अनुभव आले की खूप खचून जायचे. अक्षरश: रडू यायच.

 

पण माझी आई मला नेहमी सांगायची की, या सगळ्या लहान-सहान गोष्टींमुळे निराश होऊ नकोस. तु सुर्य आहे. तुझी गुणवत्ता कोणीही झाकून टाकू शकत नाही. एक दिवस तु नक्कीच चमकशील. तो दिवस आता आला आहे, असं मला मनोमन वाटतं. 

 

सोनालीचं जवळपास प्रत्येक गाणं आज ट्रेंडिंग होतं. आधी ती टिकटॉकवर शेअर करायची. आता इन्स्टाग्राम आणि यु ट्यूबवर तिच्या गाण्यांची अक्षरश: धूम सुरु असते. 'दिलाची राणी...' हे तिचं गाणं तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरलं. हे गाणं सोशल मिडियावर गेलं आणि प्रचंड गाजलं. त्यानंतर मिलियन व्ह्यूजचा सिलसिला सुरु झाला, जो आजतागायत कायम आहे. मला सिंगर म्हणून माझं नाव टिव्हीवर पाहायचं होतं. तेच माझं स्वप्न होतं. हे स्वप्न आज पुर्ण झालं आहे. जवळपास प्रत्येक ऑडियो प्लॅटफॉर्मवर माझं गाणं आहे आणि ते रसिकांना आवडत आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या आयुष्यातल्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत, असं सोनाली अत्यानंदाने सांगते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलयु ट्यूबइन्स्टाग्राम