स्काय डायव्हिंग असं नुसतं म्हटलं तरी आपल्यातील अनेकांना भिती वाटते. भिती असली तरी साहस म्हणून आपण एकदा तरी स्काय डायव्हिंग करुन पाहायला हवं असं आपल्याला वाटतं. मग कधी कुठे फिरायला गेलो की आपण एकमेकांच्या पाठिंब्याने हा अनुभव घेण्याचे डेअरींग करतोही. मात्र प्रत्यक्ष जेव्हा उडी मारण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला ब्रम्हांड आठवते आणि पोटात गोळा येऊन भयंकर भिती वाटते. अनेकदा नवऱ्याने आग्रह केला म्हणून किंवा मित्रमंडळीनी करायला लावले म्हणून स्काय डायव्हिंग करणारे आकाशात असताना एकमेकांना भिती वाटल्याने राहाने शिव्या देतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. याशिवायही सोशल मीडियावर कधी अतिशय प्रेमाचे तर कधी डोळ्यात पाणी आणणारे, कधी भयंकर तर कधी अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ व्हाय़रल होत असतात (Skydiving Stuns of Women Viral Video).
नुकताच स्काय डायव्हिंग करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्काय डायव्हिंग करताना भितीने आपले धाबे दणाणते आणि प्रत्यक्ष उडी मारायला आपण बराच वेळ घेतो. मग आपल्या सोबत असणारे लोक आपल्याला धीर देत यामध्ये कशी मजा आहे हे सांगतात आणि अंगात सगळे प्राण एकवटून आपण अखेर डोळे मिटून उडी मारतो. ही सगळी प्रक्रिया अनेकांसाठी भितीची काहीशी उत्सुकतेची आणि घाबरवणारी असते. पण व्हिडिओमध्ये दिसत असलेली तरुणी स्काय डायव्हिंग कऱण्याआधी हवेतच अतिशय आनंदाने व्यायाम करताना दिसत आहे. केटी वैसेनिना (Katie Vasenina) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ २० दिवसांत जवळपास ६ लाख जणांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर नेटीझन्स त्यावर विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.
हे पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण स्काय डायव्हिंग करण्याआधी ही तरुणी घाबरलेली तर दिसतच नाही. उलट ती अतिशय सहजपणे आपल्या हेलिकॉप्टरच्या बाहेरच्या एका बारला धरुन पायाचे व्यायामप्रकार करताना दिसते. हे करताना तिच्या चेहऱ्यावरही फारशी भिती नसल्याचे आपल्याला दिसते. तिच्या डोक्यावर एक कॅमेरा असून तिने हेल्मेटही घातले असल्याचे दिसते. तिच्या बाजूला एक व्यक्ती असून ती व्यक्ती या तरुणीला आता उडी मार अशा आशयाची खूण करते आणि ही तरुणी काही सेकंदात अगदी सहज उडी मारतेही. हजारो फूट उंचावरुन आपण आकाशातून जमिनीवर उडी मारतो तेव्हा ते भितीदायक तर असतेच पण रोमांचकही असते. हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला या महिलेच्या धाडसाचे नक्कीच कौतुक वाटेल.