हसणे ही आपल्या मनातून येणारी आनंदाची भावना दर्शवते. आपण खूश असलो की नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. पण हसण्याची सक्ती होऊ शकत नाही. हसणे हा उत्तम आरोग्यासाठी एकप्रकारचा व्यायाम असला तरी ठरवून हसणे किंवा खोटे हसणे हे जरा अजबच. मात्र एका महापौरांनी आपल्या राज्यात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अजब आदेश काढला आहे. यामध्ये कर्मचारी हसले नाहीत तर त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते असे म्हटले आहे. आता हा आदेश कुठे काढण्यात आला असा साहजिकच प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर फिलिपीन्समध्ये (Philippines) लूजॉन आयलंडच्या क्यूजॉन प्रांतामध्ये हा आदेश काढण्यात आला आहे (Smile or get fined mayor gives orders to government employees).
याठिकाणी कर्मचारी हसले नाहीत तर त्यांना दंड लावण्यात येईल असे या आदेशात म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी येथील महापौरांनी हा अजब आदेश काढला असल्याचे म्हटले आहे. महापौरांच्या म्हणण्यानुसार, लोकांना सेवा देताना शांतपणे आणि हसत्या-खेळत्या वातावरणात सेवा मिळायला हव्यात. त्यांना स्थानिक स्तरावर आलेल्या तक्रारींवरुन त्यांनी हा नवा नियम लागू केला असल्याचे महापौर अगुरे यांचे म्हणणे आहे.
आपण विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये जात असतो. त्याठिकाणी आपल्याला मिळणारी वागणूक कशी असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सर्व देशात तीच परिस्थिती असून नागरीक जेव्हा टाऊन हॉलमध्ये कर भरणा करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना म्हणावी तितकी चांगली वागणूक मिळाली नाही.
कपडे धुताना वापरा ४ गोष्टी, कपडे होतील सुगंधित- पावसाळ्यात कुबट वासही येणार नाही
महापौरांच्या म्हणण्यानुसार अनेकदा नागरिक आजुबाजूच्या गावांतून चालत टाऊन हॉलमध्ये काही कामानिमित्त येतात. तेव्हा त्यांना योग्य प्रकारच्या सेवा देणे सरकार म्हणून आपले काम असते. अशावेळी कार्यालयातील कर्मचारी योग्य पद्धतीने वागले नाहीत तर नागरीक हैराण होतात. महापौर होण्याआधी अगुरे ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम करत होते, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वगणुकीत बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जे कर्मचारी या नियमाचे पालन करणार नाहीत त्यांचा ६ महिन्यांचा पगार कापला जाईल किंवा त्यांना कामावरुन निलंबित केले जाईल. त्यामुळे येथील नागरीकांना येत्या काळात चांगल्या सरकारी सेवा मिळू शकतील अशी आशा आहे.