पावसाळ्याच्या दिवसांत घरात साप घुसणे, ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंथरुणात साप येणे किंवा अगदी आपण रस्त्याने जात असताना सापाने अचानकपणे आपल्याला दंश करणे हे सामान्य आहे. पावसाळ्यात साप बिळातून किंवा शेतातून बाहेर येतात हे खरे असले तरी एखाद्या व्यक्तीच्या कानात साप गेल्याचे आपण विशेष कधी ऐकले नसेल. साप अंगावर चढणे किंवा सापाने विळखा घालणे हे कदाचित आपण वाचून किंवा ऐकून असतो. पण अशाप्रकारे सापाने कानात शिरणे ही गोष्ट आपण कधी ऐकली नसेल. ऐकून किंवा पाहून किळस वाटेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Snake Inside The Ear Shocking Footage Viral on Facebook).
साप म्हटले की आपण काहीसे घाबरुन जातो. त्यामुळे तो आपल्या आसपास येणे आणि थेट कानात शिरणे तर किती भितीदायक किंवा घृणा वाटणारे असेल याचा कदाचित आपण अंदाजही लावू शकणार नाही. हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला असून यामध्ये एका मुलीचा कान आणि त्यामध्ये अडकलेला साप आपल्याला दिसू शकतो. डॉक्टर वेगवेगळ्या गोष्टी वापरुन हा अडकलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नसल्याचेही दिसते. कधी कापसाने तर कधी सिरींजमधून पाणी टाकून, कधी वेगळ्या प्रकारच्या सुयांचा वापर करुन डॉक्टर या अडकलेल्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही घटना नेमकी कुठे आणि कोणासोबत घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण व्हिडिओमध्ये केवळ एका महिलेचा कान आणि डॉक्टरांचे ग्लव्हज घातलेले हात दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा साप मागच्या दिशेने आत गेलाच कसा असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. सोशल मि़डियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. शेवटी साप बाहेर आला की नाही, कसा आला हे मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही. जवळपास ४ मिनीटांचा हा व्हिडिओ नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात पाहिला आहे.