जंगलातले प्राणी बलाढ्य असतात, त्यामुळे आपल्याही त्या प्राण्यांची भिती वाटते. हे प्राणी शिकार करतात म्हणजे ते हिंस्त्र असतात असंच आपल्या मनावर कायम ठसवलेलं असतं. पण प्रत्यक्षात या प्राण्यांमध्येही मायेचा झरा असतोच. याचाच प्रत्यय नुकताच एका व्हिडिओवरुन समोर आला. जंगल म्हटलं की आपल्याला भिती वाटत असली तरी त्यांच्यासाठी ही जागा एखाद्या घरासारखीच असते. जंगलात माकड, हरीण, सिंह, वाघ, हत्ती, सांबर, चितळ, बिबट्या, गवा, रानमांजर, कोल्हा, अस्वल यांसारख मोठे प्राणी तर राहतातच. पण याठिकाणी असंख्य लहान प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी यांच्या जमातीही गुण्यागोविंदाने राहत असतात. जंगलातल्या प्राण्यांच्या काही जोड्या प्रामुख्याने सांगितल्या जातात. काही पक्षी माकडांना कॉल देत आपला जीव वाचवायला सांगतात. तर माकडं झाडावरुन जमिनीवर असलेल्या हरणांना कॉल देत आपला जीव वाचवण्याचा इशारा करतात.
आपण ज्याप्रमाणे कोणाची अडचण असेल की मदतीला धावून जातो, त्याचप्रमाणे प्राणीही आपल्या परीसरात राहणाऱ्या जीवांची मदत करतात. एकमेकांची शिकार करणारे हे प्राणी प्रसंगी आपल्या अधिवासात राहणाऱ्या इतर प्राण्यांना मदत करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक चिपांझी वाघाच्या बछड्यांची काळजी घेताना आणि त्यांच्यावर प्रेम करताना दिसत आहे. आयएफएस ऑफीसर डॉ. सम्राट गोवडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून या सुंदर व्हिडिओसाठी काही सुयोग्य कॅप्शन द्या असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल होत आहे की २.५ कोटीहून अधिक जणांनी तो पाहिला आहे. ११ हजारांहून अधिकांनी हा व्हिडिओ लाइक केला असून अनेकांनी यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
Any suitable caption for this beautiful clip?.... pic.twitter.com/NBWQzXSnf7
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) June 30, 2022
एका झाडाखाली एक मोठे चिपांझी माकड बसले असून त्याच्या बाजूला वाघाचे ३ बछडे खेळत आहेत. हे बछडे छोटे असून ते चिंपांझी माकडाच्या अंगाखांद्यावर उड्या मारत आहेत. इतकेच नाही तर हे माकड यातील एका बछड्याला बाटलीने दूध पाजताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दोघे एकमेकांशी मस्ती करताना, प्रेमाने एकमेकांना कुरवाळताना दिसत असल्याने माकड वाघाच्या बछड्यांची अतिशय छान काळजी घेत त्यांना सांभाळत असल्याचे दिसते. आता हा व्हिडिओ नेमका कोणत्या जंगलातील आहे हे मात्र अद्याप समोर आले नाही मात्र ३४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये माकडाची माया दिसून येते. वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणीही एकमेकांना कसे जपतात तेच यातून आपल्याला दिसते.