वाढदिवस म्हटलं की तो कसा आपल्या हक्काचा आणि आनंदाचा दिवस असतो. कारण यादिवशी आपल्या जिवलग लोकांकडून छान- छान गिफ्ट मिळतात. आपल्याला जे हवं असतं ते आपल्या जवळच्या लोकांनी अचूक हेरलं आणि आपल्याला तेच गिफ्ट दिलं तर वाढदिवसाची मजा आणखी वाढते. पण इथं या मुलीच्या बाबतीत मात्र भलतंच झालं. तिच्या वडिलांनी तिला वाढदिवसाच्या दिवशी घाणेरड्या पाण्याने भरलेली एक बाटली चक्क गिफ्ट म्हणून दिली... बघा बरं असं त्यांनी का केलं असावं? या विचित्र गिफ्टमागची खरीखुरी स्टोरी सध्या साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ( A man gifted his daughter a dirty bottle of water)
Patricia Mou या सोशल मीडिया हँडलवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात ती मुलगी म्हणते की आतापर्यंत माझ्या बाबांनी मला खूप छान- छान गिफ्ट दिले.
पण यावेळेस मात्र त्यांनी मला एक घाणेरड्या पाण्याने भरलेली बाटली आणून दिली. मी पण ते गिफ्ट पाहून सुरुवातीला खूप चक्रावले. पण त्यामागचा त्यांनी सांगितलेला अर्थ मात्र खूप गहिरा होता.. कारण त्यांना त्या गिफ्टच्या माध्यमातून मला एक लाखमोलाचा धडा शिकवायचा होता.
त्या बाटलीमध्ये फक्त १० टक्के गढूळ पाणी होतं आणि बाकी पाणी चांगलं होतं. पण त्यांना मला हे सांगायचं होतं की ही बाटली जेव्हा मी हलवेल तेव्हा त्यातलं सगळंच पाणी मला गढूळ दिसेल.
याचाच अर्थ असा की जेव्हा माझ्या मनात वाईट असेल तेव्हा सगळं जग मला वाईट दिसेल. पण प्रत्यक्षात तसं नाही. आपल्या आजूबाजूच्या बहुतांश गोष्टी चांगल्या आहेत. पण आपण ते न पाहता वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. पण आपण जर चांगल्या मनाने जगाकडे पाहिलं तर मात्र ते नक्कीच छान दिसतं. जसं बाटली हलवली नाही तर घाण तळाशी बसते आणि वरचं पाणी स्वच्छ दिसू लागतं. आता तुम्हीच सांगा आहे की नाही हे कमालीचं गिफ्ट?