कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षणं जगभरात सुरू झाले. ऐरवी शाळेत शांत न बसणारी मुलं ऑनलाईन क्लासेसमध्ये कसा प्रतिसाद देतील याचाच विचार अनेक शिक्षकांच्या मनात होता. पण काही खोडकर मुलं प्रत्यक्ष शाळेत असो किंवा ऑनलाईन क्लास, दांडी मारण्याचे आणि अभ्यास न करण्याचे एकपेक्षा एक मार्ग शोधून काढतात.
सोशल मीडियावर ऑनलाईन मिटिंग्समधल्या गमती तर कोणाची फजिती होतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या एका लहान मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर मुलं काय काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल.
तुम्ही पाहू शकता या मुलीनं लॅपटॉप समोर एक बाहुलीच्या आकाराची डमी मुलगी ठेवली आणि स्वत: झोपली आहे. विशेष म्हणजे तिनं या डमीला मास्क, चष्मासुद्धा लावला आहे जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. या मुलीची क्रिएटिव्हीटी पाहून युजर्सनी विनोदी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
१६ सप्टेंबरला हा फोटो Uncle Derrick @derrickdmv या ट्विटर युजर्सनं शेअर केला होता. ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. तर ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो कोणी काढला असावा याबाबत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान लॉकडाऊनमध्ये लोक घरात बसून टीव्ही आणि मोबाईलवर ८ ते १० तास वेळ घालवीत आहेत. यात मुलेही मागे नाहीत. अगदी पाच सहा वर्षांची मुलेही आॅनलाईन क्लासमध्ये व्यस्त आहेत. सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत.
तज्ज्ञांचे असे मत आहे की, मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत मुलांचे डोळे हे संवेदनशील असतात. अशावेळी सतत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोेबाईल व लॅपटॉप पाहून डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, अंधूक दिसणे अशा तक्रारी येत आहेत.
12 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे आॅनलाईन क्लास बंद व्हायला हवेत. या मुलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे, डोळ्यात जळजळ होत आहे, डोळे लाल होत आहेत. मोबाईलवर अभ्यास केल्यानेच बहुतांश समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, टीव्हीपेक्षा मोबाईलची स्क्रीन छोटी असते. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे अथवा अॅलर्जी, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, दृष्टिदोष अशा समस्या येऊ शकतात. तसेच, सतत डोळ्यांवर ताण पडून स्मृतीवर परिणाम पडू शकतो.