महंगाई डायन खाये जात है.. हे गाणं कालबाह्य होणंच असं अशक्य असं वाटावं इतक्या वेगानं महागाई वाढली. लोकांच्या हाती उत्पन्न वाढत असलं तरी गरज, बदलती लाइफस्टाइल, वाढते खर्च आणि महागाई यांनी पैसा पुरतच नाही असं एकूण चित्र. त्यात तुम्ही मेट्रो सिटीत मोठ्या शहरात राहत असाल तर किती पगार मिळाला तर तो पुरेसा याचं काही गणित नाही. नुकतंच एका तरुणीनं एक ट्विट केलं की महिन्याला पाच आकडी म्हणजे अगदी ५० हजार रुपये जरी पगार असला तरी पैसा पुरत नाही. त्यावरुन मोठा गदारोळ झाला, सोशल मीडियात लोकांनी तिला खर्च कमी करण्याचे सल्ले दिले तर कुणी म्हणालं की अगदी खरं आहे महागाई आणि बदलती जीवनशैली यानं नाहीच पन्नास हजारही पुरत (Social Viral Tweet about inflation )..
मेधा गंती असे नाव असलेल्या एका तरुणीने एक ट्विट केलं. ती म्हणते, फ्रेशर असणाऱ्यांना इतका कमी पगार का दिला जातो? मेट्रो सिटीमध्ये इतक्या कमी पगारात राहणे अतिशय अवघड आहे. ५० हजार महिन्याला मिळत असतील तर त्यातून तुम्ही क्वचितच काही बचत करु शकता. त्यात सगळ्यांनाच काही घरचे पाठबळ नसते आणि कमवत असताना त्यांच्याकडे हात तरी कसे पसरायचे? तिच्या या वक्तव्यावर नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. फ्रेशरला ५० हजार इतकी जास्त सॅलरी कोण काय म्हणून देईल असे प्रश्नही विचारले आहेत.
तर काहीजणांनी सांगितले की सॅलरी तुम्हाला पुरते की नाही ते तुमच्या लाईफस्टाईलवर ठरते. आम्ही जेव्हा नोकरी केली तेव्हा आपला पगार १५-२० हजार रुपये होता. त्यातून सगळे खर्च करुन आपण पैशांची बचत करत होतो.. तुम्हाला मिळत असलेले पैसे तुम्ही कशाप्रकारे खर्च करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असे म्हणत अनेकांनी या मुलीला चांगलाच टोला लगावला आहे. त्यामुळे महागाई वाढत आहे हे जरी खरे असले तरी एका व्यक्तीला एका महिन्यासाठी ५० हजार ही रक्कम अगदीच पुरेशी आहे असं काहींचं मत. ज्यातून मेट्रो सिटीमध्ये राहूनही महिन्याचा खर्च निघून व्यवस्थित बचत होऊ शकते. तेव्हा खर्चाबाबत बोलताना आधी आपली लाईफस्टाइल कशी आहे हे तपासून पाहायला हवे असाच सल्ला नेटीझन्सनी या तरुणीला दिला आहे. पण काहींना मात्र पटलं की नाही भागत हल्ली पन्नास हजारांतही..