बायकांचे एकमेकींच्या साडीकडे, ड्रेसकडे, हेअरकटकडे, मेकअपकडे, दागिन्यांकडे बारकाईने लक्ष असते हे आपण जाणतोच, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात या गोष्टी बारकाईने तपासल्या जातात, तेव्हा दोन देशांमधली भांडणं चव्हाट्यावर कशी येतात, हे सांगणारी ताजी घटना. एरव्ही एकसारख्या साड्या ड्रेस दिसला तरी बायकांना ऑकवर्ड वाटतो, माझी स्टाइल कॉपी केली म्हणून चर्चा होते. स्वस्त कॉपी ऑनलाइन घेतल्याचे आरोप होतात. तेच आता कसं आंतरराष्ट्रीय राजकारणात होतं आहे. टेरिफच्या नव्या धाकात अमेरिकन प्रेस सेक्रेटरीच्या 'ड्रेसची लेस' आता वादाचा विषय ठरली आहे.
अलीकडेच व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या 'मेड इन चायना' ड्रेसवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. चीनचे राजदूत झांग झिशेंग यांनी लेविट यांना ट्रोल केले आणि म्हटले की चीनवर टीका करणे हा व्यवसाय आहे, परंतु खरेदी फक्त चीनकडूनच केली जाते. नेटकऱ्यांनीही अमेरिकेला ट्रोल करत यथेच्छ तोंडसुख घेतले आहे.
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आता ऑनलाइन देखील दिसून येत आहे. यावेळी वादाचे कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट आहेत, ज्यांचा चिनी पोशाख घातलेला फोटो व्हायरल झाला आहे.
हा फोटो सर्वप्रथम इंडोनेशियातील डेनपासार येथील चीनचे अर्थतज्ज्ञ झांग झिशेंग यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी सांगितले की लेविटच्या ड्रेसवरील लेस चीनमधील "माबू" नावाच्या गावात असलेल्या कारखान्यात बनवण्यात आली होती. झांगने गमतीने लिहिले, "चीनवर टीका करणे हा अमेरिकेचा छंद आहे, पण चीनमधून खरेदी करणे ही त्यांची सवय आहे."
या पोस्टनंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. अनेकांनी लेविटवर दुटप्पीपणाचा आरोप केला. ते म्हणाले की, एकीकडे अमेरिका चीनविरुद्ध कठोर कारवाई करते आणि दुसरीकडे चीनमध्ये बनवलेल्या उत्पादनांचा वापर करते.
एका युजरने लिहिले: "लेविट चिनी पोशाख घालून 'मेड इन चायना' वर टीका करत आहे, हे किती मोठे ढोंग आहे."
आणखी एकाने लिहिले: "हा राजकारण्यांचा जुना खेळ आहे - ''एकीकडे चीनला दोष द्या, दुसरीकडे त्यांच्याकडूनच स्वस्तातला माल खरेदी करा"
मात्र, काही लोकांनी लेविटच्या बाजूनेही लिहिले, त्यात म्हटले आहे की, ''कदाचित तो ड्रेस चिनी नसून फ्रान्समध्ये बनवलेला असेल. चिनी लोक जशी इतर महागड्या गाड्यांची बनावट प्रत बनवतात, तशीच त्यांनी ही ड्रेस डिझाईन अन्य कोठून चोरलेली असू शकते!
कॅरोलिन लेविटचा लेस ड्रेस वादाचे कारण बनला :
या वादविवादाच्या दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (MAGA) वस्तूंबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून लक्षात येते की इतकी किरकोळ बाब सुद्धा दोन देशांमधल्या वादाचे कारण न राहता आता ती जगभरातील नेटकऱ्याच्या चर्चेचा विषय झाली आहे.