आईचं दूध तिच्या बाळासाठीचा सर्वोत्तम आहार. म्हणूनच तर बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला अन्य काहीही देऊ नका, असा सल्ला डॉक्टर देत असतात.. काही स्तनदा मातांना खूप जास्त प्रमाणात दूध असतं. बाळाचं पोट भरल्यानंतरही आईला दूध येत असेल तर ते वाया जातं. त्यामुळेच तर आता जगभरात आणि भारतातही काही ठिकाणी ब्रेस्ट मिल्क साठवून ठेवण्याच्या बँक (human milk bank) तयार करण्यात आल्या आहेत. या बँकांमधून गरजू बाळांपर्यंत दूध पोहोचविता येतं...
इथपर्यंत तर सगळं ठिक आहे, पण ब्रिटनमधली ही महिला आणि तिथल्या इतरही काही महिला जे करतात, ते खरोखरंच गजब आहे.. 'द सन' यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या महिलेने आतापर्यंत तिचे कित्येक लीटर दूध विकले असून त्यातून ती दर महिन्याला लाखो रूपये कमावते. ही महिला तिचे दूध फक्त बॉडी बिल्डर लोकांनाच विकते. मिला डेब्रिटो असं या महिलेचं नाव.
या महिलेने तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून एका पाऊचमध्ये घालून ती तिचं दूध विकते. या दुधाला तिने गोल्ड मिल्क असं नाव दिलं आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगते की तिच्या बाळाची गरज भागल्यानंतरही तिला भरपूर दूध येत होतं. त्यामुळे हे दूध विकण्याचं तिच्या मनात आलं आणि तिने ते सुरूही केलं. हा ट्रेण्ड तिकडे बराचा फोफावला असून अशा पद्धतीने अनेक महिला त्यांचं दूध विकतात. दूध विकण्याआधी महिलांना स्वत:च्या काही चाचण्या करून घ्याव्या लागतात. त्यातून त्या महिला धुम्रपान आणि मद्यपान करत नाहीत ना, हे तपासलं जातं. बॉडी बिल्डर लोक असं दूध घेण्यास जास्त उत्सूक असतात. कारण त्यांच्या मते हे दूध स्नायुंसाठी अधिक फायदेशीर असतं. ३० एमएल ब्रेस्टमिल्क तिकडे १०० रूपयांपेक्षाही अधिक किमतीत विकलं जातं.