Join us  

लहानपणीच ऐकण्याची क्षमता गमावलेल्या लेकानं ३५ वर्षांनंतर ऐकला आईचा आवाज, पाहा इमोशनल व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 2:34 PM

Son Heard his Mother Voice for the First Time After 35 Years Viral Video : हा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देया व्हिडिओला जवळपास १ लाख लाईक्स आले असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. या प्रसंगी या तरुणाची मुलगीही त्याच्या बाजूला होती आणि तिलाही आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसते.

ऐकू येणं काय असतं याची खंत कदाचित तुमच्या-आमच्या सारख्या सामान्यांना नसते. पण ज्यांना आवाजच ऐकू येत नाहीत त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप वेगळं असतं. सगळ्या गोष्टींचे संदर्भ हावभाव आणि हालचालींवर लावावे लागतात. अशावेळी ऐकण्याची ताकद काय असते हे त्यांनाच समजू शकते. इंटरनेटवर अनेकदा काही ना काही इमोशनल गोष्टी व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एक तरुण तब्बल ३५ वर्षांनी आपल्या आईचा आवाज ऐकतो आणि त्यानंतर त्याचे आणि त्याच्या आईचे, आजुबाजूला उपस्थित असणाऱ्यांचे काय होते हे दिसते (Son Heard his Mother Voice for the First Time After 35 Years Viral Video). 

तर एका तरुणाने १-२ नाही तर तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या आईचा आवाज पहिल्यांदा ऐकला आणि त्याला आणि त्याच्या आईला अश्रू अनावर झाले असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो पाहून आपल्यालाही गहिवरुन आल्याशिवाय राहणार नाही. २ वर्षाचा असताना या मुलाला मेनिंजायटीस हा आजार झाला आणि त्यामध्ये त्याची श्रवणशक्ती पूर्णपणे नाहीशी झाली. त्यामुळे तो जसा मोठा होत गेला तसा आपल्या पालकांशी आणि आजुबाजूच्यांशी केवळ हातवारे करुनच संवाद साधायचा. आपण कधीतरी आवाज ऐकू शकू अशी आशा त्याला कायम होती. अखेर ३५ वर्षांनी ही गोष्ट शक्य झाली आणि त्याच्या आईने त्याला त्याच्या नावाने हाक मारल्याचे तो आपल्या कानाने ऐकू शकला. 

हा क्षण त्याच्यासाठी आणि त्याच्या आईसाठीही अतिशय भावनिक होता. आपण दिलेल्या आवाजाला आपल्या मुलाने दिलेला प्रतिसाद त्या मातेसाठीही किती मोठा असेल याची आपण नक्कीच कल्पना करु शकतो. ही घटना परदेशातील असल्याचे आपल्याला या व्हिडिओवरुन लक्षात येते. विशेष म्हणजे या प्रसंगी या तरुणाची मुलगीही त्याच्या बाजूला होती आणि तिलाही आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसते. तेव्हा हा तरुण आपल्या मुलीला जवळ घेतो आणि अश्रूंना वाट मोकळी करुन देतो. इन्स्टाग्रामवर गुडन्यूज मूव्हमेंटस या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला जवळपास १ लाख लाईक्स आले असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया