काही वर्षांपुर्वी वडिलांचेही निधन झाले आणि आता आईही सोडून गेली. हा धक्का भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगाट (BJP leader and actress Sonali Phogat) यांच्या लेकीला पचवणे खरोखरंच कठीण आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वयातच आई- वडिलांचे मृत्यू बघणे आणि सोसणे अतिशय कठीण. म्हणूनच तर आईच्या निधनाने सोनाली यांची मुलगी यशोधरा ही अक्षरश: कोलमडून गेली आहे. पण अशा परिस्थितीतली तिने स्वत:ला सावरून ठेवलं आणि आईच्या अंतिम प्रवासाची (final rituals of Sonali Phogat) सगळी कर्तव्ये पार पाडली.
भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा कोणत्याही स्त्रीचं निधन होतं, तेव्हा तिचे अंत्यसंस्कार तिचा मुलगा किंवा तिचा नवरा करतो. पण ते दोघेही ह्यात नसतील तर कुटूंबातील एखादा जवळचा पुरुष नातलग ही जबाबदारी उचलतो. पण मुलींकडून सहसा अशी शेवटची क्रियाकर्मे करून घेतली जात नाही. पण यशोधराने ही परंपरा मोडली आणि पुढे होत आईच्या पार्थिवाला तर खांदा दिलाच, पण अंत्यसंस्कारही केले. यशोधरा ही सोनाली यांची एकूलती एक मुलगी. पतीचे काही वर्षांपुर्वीच निधन झालेले. त्यामुळे यशोधरा आणि तिचा चुलत भाऊ या दोघांनी मिळून सोनाली यांच्या अंतिम संस्काराचे विधी पार पाडले.
आज काळ बदलतोय, तसा समाजही काही बदल स्विकारू लागला आहे. मुलगा- मुलगी आणि त्यांची वेगवेगळी कामं हा भेद काही अंशी तरी पुसण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणूनच तर मुलींनी पुढे होऊन माता- पित्यांचे अंत्यसंस्कार केले, किंवा सुनांनी मिळून सासुच्या पार्थिवाला खांदा दिला, अशा पद्धतीच्या घटना आता वरचेवर ऐकिवात येऊ लागल्या आहेत. मुली भावनिक असतात. त्यामानाने मुलगे मात्र मनाने थोडे कणखर असतात, या विचारांतून मुलालाच आई- वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा हक्क मिळाला असावा, असे मानले जाते. पण आता मात्र ज्या मुली स्वत:हून पुढे येऊन हे सगळं करू पाहत आहेत, त्यांना होणाऱ्या विरोधाची धार दिवसेंदिवस बोथट होत आहे, हे नक्कीच समाधानकारक आहे. नाही का?