Join us  

बाळ झाल्यावर वजन वाढणारच पण...! सोनम कपूर सांगतेय आई झाल्यावर सुटली तब्येत तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 3:41 PM

Sonam Kapoor Weight Gain After Pregnancy : आई म्हणून नवीन जबाबदारी स्विकारताना होणारे मानसिक, शारीरिक, भावनिक बदलांशी जुवळून घेणे ही कोणत्याही महिलेसाठी अजिबात सोपी गोष्ट नसते.

आपण कायम मस्त फिगरमध्ये असावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. पण कधी आरोग्याच्या समस्या, व्यायामाचा अभाव किंवा आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे वजन वाढते आणि शरीर बेढब दिसायला लागते. वजन वाढण्यामध्ये आणि फिगर खराब होण्यामध्ये प्रेग्नन्सी हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो. बाळ होण्याच्या आधी आणि नंतरही बऱ्याच तरुणींचे वजन वाढते. बाळ झाल्यानंतर वजन वाढले तर ते कमी होण्यासाठी तरुणींकडून आटोकाट प्रयत्न केला जातो. करीयरमध्ये ब्रेक घेऊन आई म्हणून नवीन जबाबदारी स्विकारताना होणारे मानसिक, शारीरिक, भावनिक बदलांशी जुवळून घेणे ही कोणत्याही महिलेसाठी अजिबात सोपी गोष्ट नसते (Sonam Kapoor Weight Gain After Pregnancy). 

(Image : Google)

अभिनेत्रींच्या बाबतीत तर त्यांची फिगर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. गेल्या २ वर्षात करीना कपूर, बिपाशा बसू, सोनम कपूर, आलिया भट यांनी मुलांना जन्म दिला आणि आई म्हणून एका नवीन भूमिकेत या अभिनेत्री पाहायला मिळाल्या. करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिचे वजन कसे आटोक्यात ठेवले, नुकतीच आई झालेली आलिया फिगर मेंटेन करण्यासाठी कशी दुसऱ्याच महिन्यात व्यायामाला लागली असे फोटो आणि व्हिडिओ आपण सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये पाहत असतो. पण अभिनेत्री सोनम कपूर हिने मात्र बाळ झाल्यानंतर वजन कमी करण्याच्या गोष्टीवर काहीशी थेट भूमिका मांडली आहे. आनंद आहुजा आणि सोनम कपूर यांचा मुलगा वायू आता ७ महिन्यांचा झाला आहे. सोनमचे वायूसोबतचे बरेच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

(Image : Google)

सोनमने आपल्या काही मुलाखतींमध्ये बाळाला नैसर्गिकरित्या जन्म देणे आणि सहजरित्या स्तनपान देणे याविषयी भाष्य केले होते. तर आता तिने नुकतेच एका मुलाखतीत एका नवीन विषयाला वाचा फोडली आहे. ती म्हणते, बाळ होण्याआधी मी जशी होते त्या अवस्थेत मी अजून आलेली नाही,  पण मी तशी व्हावे यासाठी मी स्वत:ला अजिबात ताण देत नाही. ती म्हणते, फिट राहण्यासाठी मी आवश्यक तो व्यायाम करते पण बाळंतपणामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचे क्रेझी डाएट करत नाही. आता आपण बाळाला अंगावर दूध पाजत असून आणखी किमान १ वर्ष हे सुरू राहणार आहे. त्यासाठी आपल्याला योग्य आहार, आराम आणि एनर्जीची आवश्यकता असते. त्यामुळे वजन कमी करणे, बारीक होण्यासाठी खूप कष्ट घेणे असे मी आता काहीही करणार नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोनम कपूर