प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने त्याची बहीण मालविका सूद-सचर पंजाबच्या राजकारणात सक्रीयपणे सहभागी होणार असल्याची घोषणा केली. पंजाबनध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणूकांसाठी त्या लढतील, मात्र अद्याप कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत ठरले नसल्याचेही त्यांने सांगितले. मालविका मोगा विधानसभा मतदारसंघासाठी लढतील, कारण त्या याच भागात त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. याबरोबरच हे सूद कुटुंबियांचेही मूळ गाव आहे.
कोण आहेत मालविका सूद - सच्चर
तिन्ही भावंडांमधील सव्रात लहान असलेल्या मालविका आपल्या मोगा या गावात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्या विशेषत: शिक्षण आणि आरोग्य या विषयात काम करतात. अभिनेता सोनू सूद हा त्यांचा मोठा भाऊ असून त्यांची मोठी बहीण मोनिका शर्मा या अमेरिकेत स्थायिक असून त्या फार्मास्युटीकल प्रोफेशनमध्ये आहे. मालविका आणि सोनू सूद हे दोघेही आपल्या आईवडिलांच्या नावाने सूद चॅरीटी फाऊंडेशच्या ही संस्था चालवतात. शक्ती सागर सूद आणि सरोज बाला सूद अशी त्यांची नावे आहेत. मालविका यांचा गौतम सच्चर यांच्याशी विवाह झालेला असून मालविका मोगा याठिकाणी IELTS चे कोचिंग सेंटर चालवतात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिकवण्याचे कामही त्या करतात.
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या विशेष काम करतात. सध्या या उपक्रमांतर्गत त्यांना देशभरातील २००० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. तसेच ज्या रुग्णांना आर्थिक मदत हवी आहे, त्यांना मदत करण्याचे कामही मालविका करतात. सच्चर या शिक्षणतज्ज्ञही आहेत. लॉकडाऊनच्या काळात मालविका यांनी वंचित मुलांसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस घतले होते. त्यांच्या वडिलांचे मोगा येथील मुख्य बाजारपेठेत ‘बॉम्बे क्लोथ हाऊस’ नावाचे दुकान आहे. तर त्यांची आई DM क़ॉलेज या ठिकाणी इंग्रजीची प्राध्यापिका होती. कोरोनाची साथी आटोक्यात आल्यानंतर या भावंडांनी मिळून मोगा गावातील गरजू विद्यार्थी आणि कामगारांना सायकली भेट दिल्या. मालविका यांनी मेरा शहर, मेरी जिम्मेदारी या नावाने आपल्या संस्थेमार्फत त्यांनी नुकतेच एक अभियान राबवले.
आता आई-वडील असते तर...
मालविका म्हणतात, आपल्याला पंजाबी असण्याचा अभिमान आहे. दुसऱ्याची सेवा करणे यांसारखी मूल्ये आपण पालकांकडून शिकलो. कोविडच्या काळात माझ्या भावाने स्थलांतर होणाऱ्यांना मदत केली कारण आम्ही कोणालाही अडचणीत असलेले पाहू शकत नाही. हेच आमच्या पालकांनी आम्हाला शिकवले आणि हाच खरा पंजाबी धर्म सांगतो. आम्ही आमच्या पालकांना मिस करतो, आता सोनू करत असलेले काम त्यांनी पाहिले असते तर त्यांना नक्कीच त्याचा अभिमान वाटला असता.
या निमित्ताने मोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोनू सीद म्हणाला, “माझ्या बहीणीचा प्रवास हा कायम तिच्या स्वत:चा प्रवास होता. आता ती पंजाबच्या लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात उतरत आहे. आमच्या कुटुंबाला आजवर जो मान आणि प्रेम मिळाले तो पंजाबच्या लोकांना पुन्हा देण्यासाठी ती ही तयारी करत आहे. मोगामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. हे आमचे मूळ गाव असल्याने ती बहुतकरुन याच विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवेल.” तर मालविका म्हणाल्या, “आम्ही शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने काम करत असल्याने रुग्णालये आणि शाळांच्या विषयातील प्रश्न सोडवणे याला माझ्याक़डून प्राधान्य असेल. अजून कोणत्या पक्षाकडून लढायचे हे ठरलेले नसले तरीही सामान्य लोकांसाठी काम करायचे असल्याने आम्ही आपली व्यवस्था सुधारण्यासाठी काम करणार आहोत, कोणताही पक्ष मोठा करण्यासाठी नाही.”