स्पा आणि मसाज सेंटर तसेच जस्ट डायल प्रकरणावरुन स्वाती मालिवाल यांचे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मालिवाल मागील काही वर्षांपासून प्रामुख्याने महिला प्रश्नांविषयी काम करताना दिसतात. दिल्लीत सध्या अनेक अवैध धंदे सुरु असून पोलिस त्यावर वेळोवेळी कारवाई करत आहेत. पण आताच्या प्रकरणात शक्य ती कारवाई करणार असल्याचे मालिवाल यांनी सांगितले आहे. दिल्लीत जस्ट डायल विरोधात उचललेल्या पावलावरुन त्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. या प्रकरणावरुन त्यांनी ट्विट करत बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात लढणाऱ्या स्वाती मालिवाल नेमक्या आहेत तरी कोण जाणून घेऊया...
१. उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथील असलेल्या स्वाती मालिवाल यांनी इर्न्फमेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात काम करायचे ठरवले.
२. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी परिवर्तन या सामाजिक संस्थेचे काम करायला सुरुवात केली.
३. याच दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत स्वाती मालिवाल सक्रीय होत्या.
४. २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल सरकारमध्ये स्वाती मालिवाल सल्लागार म्हणून काम करत होत्या. सार्वजनिक स्तरावरुन येणाऱ्या तक्रारींचे काम त्या प्रामुख्याने पाहत होत्या.
५. त्यानंतर अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांची दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
६. २०१८ मध्ये त्यांचा या पदाचा कार्यकाळ संपला, मात्र पुढील ३ वर्षांसाठी हा कार्यकाळ वाढविण्यात आला.
७. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेल्यांना ६ महिन्यांच्या आत फाशी मिळावी या मागणीसाठी स्वाती मालिवाल यांनी २०१८ मध्ये १० दिवसांचे उपोषण केले होते. केंद्र सरकारने शनिवारी १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार झाल्यास आरोपीला फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी स्वाती मालिवाल यांनी केली होती. त्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले होते.
८. आता झालेल्या प्रकरणात स्वाती मालिवाल यांना स्पा आणि मसाज सेंटरविषयी माहिती मिळवायची होती. त्यासाठी त्यांनी जस्ट डायल या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून मेसेजव्दारे संपर्क केला. त्यावेळी त्यांना १५० हून अधिक कॉल गर्लचे रेट सांगण्यात आले. याविरोधात स्पा आणि मसाज सेंटरबरोबरच जस्ट डायलवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या करत आहेत.