आपण घरातील प्राण्यांना आपण अगदी प्रेमाने अन्न भरवतो. अनेकदा हे पाळीव प्राणी इतके माणसाळलेले असतात की ते मालकाच्या ताटातही जेवतात. इतकेच नाही तर भूतदया म्हणून आपण आपल्या घराच्या आजुबाजूला असणारे कुत्रा, मांजर यांना काही ना काही खायला घालतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण चिमणी, कावळे, कबुतरे, पोपट यांच्यासाठी बाल्कनीत पाणी ठेवतो. आपल्याप्रमाणेच त्यांनाही तहान लागत असेल तर त्यांचे हाल होऊ नयेत असा त्यामागचा उद्देश असतो. अनेकदा बाल्कनीमध्ये आपण या पक्ष्यांसाठी काही ना काही खाऊ ठेवतो. हे पक्षी आपल्या नकळत येऊन हा खाऊ खाऊनही जातात. पण जंगलातील प्राण्यांना बाल्कनीतून अन्न भरवल्याचे आपण क्वचितच पाहिले असेल.
जंगली प्राणी म्हटल्यावर आपल्याला काहीशी भिती वाटते. हे प्राणी आपण साधारणपणे जंगलात किंवा प्राणी संग्रहालयातच पाहतो. त्यांचा आकार पाहूनच काहीवेळा आपण घाबरुन जातो. मग त्यांना खायला घालणे वगैरे तर दूरचीच बात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला आपल्या घराच्या बाल्कनीतून चक्क जिराफांना अन्न भरवताना दिसत आहे. ती अतिशय शांतपणे त्यांना भरवत असून तेही तितक्याच आवडीने तिने दिलेले खात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे आपण प्राण्यांशी प्रेमाने वागल्यास ते जंगलातील असतील तरीही ते आपल्याला काही करत नाहीत हेच दिसून येते. विशेष म्हणजे जिराफांची मान उंच असल्याने ती या महिलेच्या बाल्कनीपर्यंत अगदी सहज पोहचत आहे.
महिला ज्या बाल्कनीत आहे ते घर दोन मजली असून ही महिला घराच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये असल्याचे दिसते. जिराफ घराच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत असून ते मान वर करुन महिला भरवत असलेले अन्न अतिशय आवडीने खात असल्याचे दिसत आहे. दोन मोठे जिराफ असून एक लहान जिराफ असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ केनियातील नैरोबी येथील असल्याचे समजते. सध्या सोशल मीडियामुळे जगाच्या कोपऱ्यात होणाऱ्या गोष्टी काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून नेटीझन्सनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. आपल्यालाही असे धाडस करायचे आहे, हे माझे पुढचे लक्ष्य आहे. शेअरींग ब्रेकफास्ट विथ जिराफ अशी कॅप्शन दिलेला हा व्हिडिओ ३ दिवसांत २१ हजारहून अधिक जणांनी लाईक केला आहे. २ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.