Join us  

मोहंजोदडोतल्या मातीतून सोन्यासारखे दागिने घडवणाऱ्या मुलीची गोष्ट; इथं माती जगणं घडवते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 2:33 PM

वडीलांसाठी मुलगा म्हणून काम करणारी लहानशी समरीन आपल्या ५ बहिणींनाही आईच्या मायेने सांभाळते

ठळक मुद्देमातीकाम हिच आवड असल्याने माती जमा करुन ती मळण्यापासून ते घडवलेले दागिने रंगवण्यापर्यंत सगळे काम ती आवडीने करतेबहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद हिच सर्वात मोठी गोष्ट

मोहंजोदडो म्हणजे ऐतिहासिक गोष्टींचा खजिनाच. ही संस्कृती पाहण्यासाठी देशातूनच नाही तर जगभरातीन लोक याठिकाणी येतात. येथील स्थानिकांचे आयुष्य सांगणाऱ्या एका लहानगीची कथा आपल्याला थक्क करते. याठिकाणी अनेक माती कलाकार आपल्या कलेतून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तसेच दागिने तयार करतात. समरीन सोलंगी ही अशीच लहान मुलगीही आपल्या वडिलांचा मातीचा व्यवसाय सांभाळते. माती फोडण्यापासून ते दागिन्यांवरची कलाकुसर असे सगळे काम ती अतिशय सराईतपणे करते. हे काम करत असताना आपण आपल्या वडिलांसाठी एखादा मुलगा करेल असेच काम करत करत असल्याचे समरीन ‘बीबीसी’शी बोलताना सांगते. 

(Image : Google)

समरीनला एकूण ५ लहान बहीणी असून त्यांची ती आईसारखी काळजी घेते. तिचे वडील आजारी असल्याने आता ते काम करत नाहीत, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्यावरच आहे. आता थंडीच्या दिवसांत पर्यटक येत असल्याने थोडा व्यवसाय होतो मात्र पुन्हा वर्षभर शांतच असते. मागच्या २ वर्षांत कोरोनामुळेही खूप तोटा झाल्याचे ती सांगते. सुरुवातीला तिच्या आजोबांकडून तिचे वडील ही कला शिकले. त्यानंतर वडीलांकडून समरीनने ही कला आत्मसात केली. ही कला आवडत असल्याने मी कधीच शाळेत गेले नाही असे समरीन सांगते.  शिकलेली कलाकारी वापरत समरीन सकाळी ६ वाजल्यापासून हे मातीकाम करते. अतिशय सुबक अशा मातीच्या मूर्ती, फ्रेम्स, दागिने ती सुंदरीत्या तयार करते. त्यानंतर ती घरातील कामेही करते. 

(Image : Google)

हे दागिने आणि शोभेच्या वस्तू समरीन अतिशय मनापासून करत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवते. आपल्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असून त्यासाठी आपण सगळे करत असल्याचे ती अगदी सहज म्हणते. डोंगरदऱ्यांतील माती आणून ती कुटणे, मळणे आणि या मातीला सुंदर असा आकार देणे, नंतर हे सगळे उन्हात आणि भट्टीत वाळवणे ही कामे समरीन करते. तसेच हे दागिने सुबकतेने रंगवण्याचे कामही समरीन करते. सिमरनचे फेसबुकवर पेजही आहे ज्या माध्यमातून ती हाताने तयार केलेल्या या वस्तूंची विक्री करते. या कमाईतून आमची रोजीरोटी व्यवस्थित होत असल्याचे ती म्हणते.

टॅग्स :सोशल व्हायरलकला