लग्नाचा पोशाख म्हटलं की तो तितकाच खास असला पाहिजे. त्यातही नवरीचा पोशाख म्हटलं की तिचा काही थाटच वेगळा असतो. आजकालच्या लग्नांमध्ये ड्रेस कसा इतरांपेक्षा हटके आहे, त्याची किंमत किती जास्त आहे, त्याची खासियत काय आहे या सगळ्या गोष्टींवरुन त्याचे स्टेटस ठरवले जाते. लग्नाचा ड्रेस जितका शाही आणि इतरांपेक्षा वेगळा असेल तितकेच तो परिधान करुन मिरवायला आनंद होतो.
सध्या इंटरनेटवर अशाच एका रत्नजडित लग्नाच्या ड्रेसची चर्चा रंगताना दिसत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इंस्टाग्राम पेज जगभरातील लोकांच्या अविश्वसनीय रेकॉर्ड्स दाखवणाऱ्या व्हिडियोंनी भरलेले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स असे अनेक नवीन नवीन अविष्कार समोर आणणारे व्हिडीओ चहत्त्यांसाठी शेअर करत असते, त्यापैकीच हा एक व्हिडीओ. आजपर्यंत आपण लग्नाच्या हटके एंट्रीचे, नवरा - नवरीच्या शाही पोशाखांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. आता या व्हिडीओ मधील ड्रेसची नेमकी काय खासियत आहे ते पाहूयात(Wedding dress with over 50,000 crystals breaks Guinness World Records).
नेमकं असं काय खास आहे या ड्रेसमध्ये...
मिशेला फेरीरो या डिझायनर फॅशन हाऊसने सर्वात जास्त क्रिस्टल्स असलेला ड्रेस तयार करण्याचा विक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, " डिझायनर फॅशन हाऊस मिशेला फेरीरोने तयार केलेल्या लग्नाच्या पोशाखावर सर्वाधिक क्रिस्टल्स असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या लग्नाच्या शाही गाऊनवर एकूण ५०,८९० क्रिस्टल्स जडविलेले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये, क्रिस्टल्संनी सजलेला भव्य लग्नाचा पोशाख परिधान करून रॅम्पवर चालणारी मॉडेल दिसत आहे. पांढरे शुभ्र कापड आणि त्यावर चमचमणारे सफेद क्रिस्टल्स यामुळे हा ड्रेस अगदी उठून दिसत आहे.
अबब ! चक्क केक आणि क्रीम पासून तयार केला वेडिंग गाऊन, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...
अबब! ९ फुट उंच हेअरस्टाईल...सर्वात उंच हेअरस्टाईलसाठी गिनिज बुकमध्ये नोंद, अनोखे रेकॉर्ड...
नेटकरी म्हणतात...
हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, याला ३.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याव्यतिरिक्त, या पोस्टला जवळपास २५,००० हून अधिक लाइक्स देखील मिळाले आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. हा रत्नजडित ड्रेस पाहून लोकांना कमेंट्स करण्याचा मग आवरला नाही. "मला या ड्रेससोबत लग्न करायचे आहे" अशी कमेंट एक युजरने केली आहे. "हा गाऊन वजनाने किती हेवी असेल" असा अंदाज एका युजरने लावला आहे. "या गाऊन वरील क्रिस्टल्स कोणी खरोखर मोजले आहेत का ?" अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. " हा ड्रेस धुवायचा कसा ?" असा प्रश्न एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये विचारला आहे.