लहान मुले आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करुन काय करतील हे सांगता येत नाही. टीव्ही हा तर सध्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झाला आहे. घरातील लहान मुलेही नकळत हा टिव्ही पाहत असतात. त्याचा त्यांच्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे आपल्याला समजत नाही. नुकतेच एका व्हिडिओवरुन लहान मुलांवर टिव्हीचा होणारा परिणाम दिसून आला आहे. काश्मिरमध्ये राहणाऱ्या एका लहानगीने असेच टिव्हीवरील बातम्या पाहून रिपोर्टर्सची बातम्या सागंण्याची पद्धत लक्षात ठेवली. इतकेच नाही तर तिने चक्क आपल्या आईला आपला व्हिडिओ काढायला सांगून आपण राहतो त्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था आपल्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या रिपोर्टरप्रमाणे ही लहानगी बोलत असल्याचे तिच्या व्हिडिओमधून आपल्याला दिसते.
हाफिजा असे या ५ वर्षांच्या मुलीचे नाव असून तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिची आई शाइस्ता हिलाल हिने याचे शूटींग केले आहे. काश्मिरमध्ये सध्या सुरु असलेला पाऊस आणि स्नो फॉल यामुळे तेथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाल्याने तिने चक्क पत्रकार व्हायचे ठरवले आणि सरळ एक व्हिडिओच शूट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्याला तिच्या घराकडे जाणारा हा रस्ता दाखवते. दोन मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये हाफिजा पाऊस आणि बर्फामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवते.
हा व्हिडिओ शूट करताना तिने छानसे लाल रंगाचे जॅकेट घातले असून त्यावर जीन्स आणि गम बूट घातल्याचे दिसते. रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने पाहुणे आपल्याला भेटायला येऊ शकत नाहीत असेही ती यामध्ये म्हणते. या रोडवर कसा कचरा टाकला आहे, तो कसा खराब झाला आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने हाफिजा एखाद्या पत्रकाराची नक्कल करावी असे व्हिडिओमध्ये सांगताना दिसते. तिच्या आईने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून रेकॉर्ड कसे करायचे याबाबतबी हाफिजा तिच्या आईला सूचना देत असल्याचे दिसते. नुकतीच हाफिजा शाळेत जायला लागली असून सगळीकडे तिच्या या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.