अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये दर्जेदार अभिनय करून सुधा चंद्रन यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहतो. पण त्या आधीही त्या एक प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. भरतनाट्यम या नृत्यशैलीवर त्यांचं विलक्षण प्रेम. त्यांचं नृत्य आणि त्यांचा अभिनय यावर त्यांचे चाहते भरभरून प्रेम करत असतात. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही त्यांचे खूप चाहते आहेत. ज्यांची एक झलक पाहण्यासाठी जिथे लाखो चाहते आतूर असतात, अशा ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांना मात्र प्रत्येकवेळी भारतातील विमानतळावर अपमानित व्हावे लागते. या सगळ्या गोष्टी वारंवार सहन करण्याचा त्यांचा संयम आता मात्र सुटला असून त्यांनी यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे.
त्याचं झालं असं की सुधा चंद्रन यांनी त्यांचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडियो सध्या खूप व्हायरल होत आहे. सुधा चंद्रन यांच्या बहुतांश चाहत्यांना माहितीच आहे की, सुधा यांनी त्यांचा एक पाय त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षीच गमावला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून सुधा चंद्रन नृत्य शिकायच्या. एकदा वयाच्या १६ व्या वर्षी त्या बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्यांचा पाय कापावा लागला. नृत्यांगना होण्याचे स्वप्न बघणाऱ्या सुधा चंद्रन यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना जयपुरी फुट बसवला. सुधा चंद्रन यांची जिद्द एवढी विलक्षण होती की जयपुरी फुट घालूनही त्यांनी अतिशय उत्तम पदन्यास केला. त्यांचे ते नृत्य पाहून त्या आर्टिफिशियल पायाने नृत्य करत आहे, हे कोणाला प्रत्यक्ष डोळ्याने बघूनही खरे वाटत नव्हते. आजही हा पाय सुधा यांचा मुख्य आधार आहे.
नेमकं याच कारणामुळे सुधा चंद्रन यांना दरवेळी विमान प्रवास करताना अनेक अडचणी येतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की माझा एक पाय जयपूरी फुट आहे, ही गोष्ट जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीही प्रत्येकवेळी जेव्हा भारतातील विमान तळावर मी जाते, तेव्हा तेथे सिक्युरिटी चेकींग करताना मला विमान तळावरील कर्मचारी माझा आर्टिफिशियल पाय काढून दाखवावा, असा आग्रह धरतात. असा पाय काढून दाखविणे अतिशय अवघड आहे आणि मुळात अशी मागणी करणेच अमानवी असून अतिशय चुकीची आहे, असे सुधा यांनी या व्हिडियोदरम्यान सांगितले आहे.
व्हिडियोमध्ये त्या म्हणतात की, सिक्युरिटी चेकींगदरम्यान असा पाय काढून दाखवायला सांगणे हे अतिशय त्रासदायक आहे. हाच सन्मान आपल्या देशात महिलांना दिला जातो का, असा प्रश्नही त्यांनी मोदी यांना विचारला आहे. त्या म्हणाल्या की ही घटना अतिशय दु:खदायक आहे. वारंवार अशा प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने मी अतिशय दु:खी असून केवळ मलाच नाही, तर माझ्यासारख्या अनेक मंडळींसाठी असे होणे अतिशय क्लेषकारक आहे. त्यामुळे हे थांबवावे आणि आम्हाला काहीतरी ओळखपत्र द्यावे, अशी मागणीही त्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य यांनी या घटनेची तात्कळ दखल घेतली असून सुधा चंद्रन यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण या बाबतीत वैयक्तिक लक्ष घालू आणि ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही ज्योतिरादित्य यांनी दिले आहे.