Join us  

Summer Special: उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याच्या खास टिप्स.. उकाडा  कमी, वाटेल कुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 8:55 PM

Summer Special: उन्हाळ्याच्या दिवसांत घरात जर काही छोटे- मोठे बदल केले तर नक्कीच घरातली उष्णता कमी होऊ शकते.. किंवा आपल्या घरात बसल्यावर आपल्याला शांत वाटू शकतं..

ठळक मुद्देउन्हाचा पारा एकदम कमी करणं तर आपल्या हातात नाही. पण घरातल्या घरात काही छोटे- मोठे बदल केले तर मात्र आपण नक्कीच आपलं घर काही प्रमाणात तरी थंड ठेवू शकतो. 

उन्हाळ्यात सगळीकडेच वातावरण तापलेले असते.. घरात- बाहेर अगदी प्रत्येक ठिकाणीच आपण उकाड्याने त्रस्त झालेले असतो. मे महिन्यात तर कधी कधी अशी वेळ येते की पंखा, कुलर यांच्यातूनही गरम हवा येऊ लागते. त्यामुळे मग घरात बसणंही अगदी अशक्य होऊ लागतं. आता उन्हाचा पारा एकदम कमी करणं तर आपल्या हातात नाही. पण घरातल्या घरात काही छोटे- मोठे बदल केले तर मात्र आपण नक्कीच आपलं घर काही प्रमाणात तरी थंड ठेवू शकतो. 

 

उन्हाळ्यात असे करा घरात बदल (small changes in house for cool look)१. केशरी, लाल, पिवळे, पोपटी असे पडदे घरात दारं- खिडक्यांना लावले असतील तर ते आधी बदलून टाका. त्याऐवजी निळा, जांभळा, बेबी पिंक असे शांत आणि पेस्टल रंगाचे पडदे लावा.२. पडद्यांप्रमाणेच उशांचे कव्हर आणि बेडशीट यांच्यातही बदल करा. हलकी शेड असणारे पेस्टल रंग उन्हाळ्यात अधिक आल्हाददायक वाटतात.३. तुमच्या अंंगणातले मनीप्लॅन्ट, स्नेक प्लॅन्ट घरात आणा आणि घरात ठिकठिकाणी ठेवा. यासोबतच काही इनडोअर प्लान्ट्सची आवर्जून खरेदी करा अणि ते घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत, खिडक्यांमध्ये सजवून ठेवा. घरात झाडे असली की आपसूकच घर शांत, थंड वाटू लागते.

४. जर उन्हाळ्यात तुम्ही टेबल फॅनचा वापर करत असाल तर त्याच्या समोर त्याच्या उंची एवढ्याच उंचीवर पाण्याने भरलेले एक पसरट भांडे ठेवा. या भांड्यात बर्फाचे तुकडे टाका. पंख्याची हवा एकदम थंड येईल. ५. दुपारी १ ते ४ यावेळेत ऊन खूप कडाक्याचे असते. अशावेळी घराचे दारं- खिडक्या बंद ठेवा. बाहेरची उष्ण हवा आत आली नाही, तर घर बऱ्याच प्रमाणात थंड राहते.

६. खिडकी किंवा दाराला जर पडते असतील तर त्यावर हॅण्ड स्प्रे चा वापर करून पाणी शिंपडा. पडदे अर्धवट ओले करा. त्यानंतर घरातले पंखे लावा. थंड पडद्यांना हवा लागेल आणि त्याचा थंडावा खोलीभर जाणवेल. ७. आजकाल खळखळ आवाज करणारे छोट्याशा धबधब्याचे अनेक शो पीस मिळतात. असं एखादं शोपीस घरात ठेवा. त्यातून वाहणारे पाणी आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज वातावरण शांत, रिलॅक्स करते. 

 

टॅग्स :समर स्पेशलहोम रेमेडी