चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करुन चेहेऱ्यावरचे दोष घालवणं आताचा काळत खूप सोपं झालं आहे. चेहेऱ्यावरचे छोटे मोठे दोष कायमचे काढून टाकून फ्लाॅलेस ब्यूटीचा ट्रेण्ड सध्या जगभर आहे. दोष झाकण्यासाठी , काढून टाकण्यासाठी होणाऱ्या या शस्त्रक्रिया खूप महागाच्या असतात. पण सौंदर्यासाठी काहीही म्हणून परदेशात जाऊनही या शस्त्रक्रिया करुन घेतल्या जातात. आपण आहोत त्यापेक्षा सुंदर दिसण्याची अपेक्षा न संपणारी आहे. जगाच्या आधी आपणच आपल्यात दोष काढायला पुढे असतो. पण अपेक्षा आणि इच्छांचा जेव्ह नाहक हट्ट किंवा अट्टाहास होतो तेव्हा नुकसानही पदरी पडतं. असंच एका रशियन माॅडेलच्या बाबतीत घडलं. तिनं चेहेऱ्यावरचे दोष घालवण्यासाठी म्हणून चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली आणि तिचा संपूर्ण चेहेराच खराब झाला. एवढंच नाही तर तिच्या जिवितालाही धोका निर्माण झाला आहे.
Image: Google
युलिया तारसेविच ही 43 वर्षीय रशियन माॅडेल आहे. 2 वर्षांपूर्वी एका सौंदर्यस्पर्धेत ती उपविजेता ठरली होती. या यशानं तिच्यात आणखी यशस्वी होण्याचे इच्छा निर्माण झाली. तिला पुढची सौंदर्य स्पर्धा खुणावत होती. आपला चेहरा निर्दोष असावा , चेहऱ्यात एक दोषही राहाता कामा नये म्हणून तिनं चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करुन घेण्याचं ठरवलं. तिला गालावरची चरबी थोडी कमी करायची होती आणि पापण्यांमध्ये तिला दोष वाटत होता. यासाठी तिनं ब्यूटी सर्जनला गाठलं. साडेचार लाख रुपये खर्चून तिने फेसलिफ्ट आणि ब्लेफेरोप्लास्टी करुन घेतली. पण झालं उलटंच. दोष दूर होणं तर राहिलं बाजुला युलियानं आपलं होतं ते सौंदर्यही गमावलं.
Image: Google
शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा चेहरा खूप सूजला. तिच्या डोळ्यांवरही त्याचा परिणाम झाला. तिने तातडीनं नेत्रविकार तज्ज्ञांना गाठलं. तिने केलेल्या सौंदर्य शस्त्रक्रियांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपचार करण्यासाठी तिच्यावर आणखी काही तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्यात. पण तिच्या डोळ्यांवर नको तो परिणाम झालाच.
Image: Google
आता युलियाला आपले डोळेच बंद करता येत नाहीये. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नाहीये. चेहरा देखीला पूर्णत: बिघडला आहे. आपला चेहरा पूर्ववत व्हावा म्हणून युलियानं 28 लाख रुपये खर्च केलेत तिच्या डोळ्यांना झालेली इजा भरुन निघत नाहीये आणि बदलेला चेहरा अजूनही पूर्वीसारखा होत नाहीये. तो पुन्हा पूर्वीसारखा दिसेल याची शक्यताही दिवसेंदिवस मावळत चालली आहे.
Image: Google
युलियानं आपला चेहेरा बिघडण्यास कारणीभूत ठरलेल्या डाॅ. खालिद आणि डाॅ. कोमारोव यांच्यावर केस दाखल केली आहे. पण हे दोन्ही डाॅक्टर म्हणतात की त्यांनी केलेली शस्त्रक्रिया अचूक होती. पण युलियामध्ये जनुकीय दोषांमुळे शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झाली आहे. डाॅ. खालिद आणि डाॅ. कोमारोव यांची चौकशी समितीमार्फत चौकशी सुरु आहे. उद्या कदाचित युलिया ही केस जिंकेलही पण तिचं गेलेलं सौंदर्य पुन्हा मिळणं मात्र अवघड झालंय हेच खरं.