आपण सिग्नलवर थांबलो की लहान मुले पैसे मागायला किंवा कहातरी विकायला आपल्या जवळ येतात. अनेकदा ते आपल्याला हात लावतात आणि खराब हात आपल्या अंगाला लावले म्हणून आपण त्यांच्यावर ओरडतो. काही वेळा त्यांचे केविलवाणाा चेहरा बघून आपण त्यांना पैसे किंवा खाऊ देतो. पण काही वेळा आपण तसेच पुढे जातो. कळकट्ट कपडे असलेले, नाक गळत असलेले, कित्येक दिवस आंघोळही न केलेली ही मुलं नुसती आपल्या जवळ आली तरी आपल्याला नको वाटतं. असं असताना त्यांच्या अंगाला हात लावणं तर सोडाच. पण एका महिलेने मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केलेली कृती तिच्याबद्दल आदर वाटावा अशीच आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अशीच एक महिला आपल्या दुचाकीवर थांबलेली असताना एक लहान मुलगा तिच्याजवळ येतो. सुरुवातीला ती त्या मुलाचे प्रेमाने गालगुच्चे घेताना दिसते. कदाचित रस्त्यावरच राहणाऱ्या या मुलाच्या अंगाच फक्त हाफ पँट असल्याचे दिसते. हा मुलगा महिलेकडे पैसे मागत असताना अचानक त्याच्या डोळ्यात काहीतरी जाते. त्यामुळे तो अस्वस्थ होतो आणि डोळे चोळायला लागतो. त्यावेळी ही महिला कसलाच विचार न करता या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे मायेनं जवळ घेते आणि त्याच्या डोळ्यात फुंकर घालते. तिचं प्रेम पाहून हा मुलगाही हरखून गेलेला दिसतो. फुंकर मारल्यावर त्याच्या डोळ्यात गेलेला कचरा निघतो आणि तो पुन्हा नीट सगळीकडे पाहू शकतो.
It doesn't cost much to be kind... pic.twitter.com/Bykv1kqJUE
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) June 10, 2022
इतकेच नाही तर नंतर ही महिला त्याला जवळ बोलवून पैसेही देते. पैसे मिळाल्यावर मात्र हा मुलगा इतका खूश होतो की तो हसत हसत निघून जातो. मात्र ती त्याला जवळ बोलावते आणि पुन्हा त्याचे गालगुच्चे घेते. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला तुम्ही दयाळू असण्यासाठी फारशी किंमत मोजावी लागत नाही अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटीझन्सनी या व्हिडिओचे जोरदार कौतुक केले असून अवघ्या काही दिवसांत या व्हिडिओला ७५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर १.५ लाख जणांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रियाही आल्या असून तो बांग्लादेशमधील असल्याचे बोलले जात आहे. पण अशाप्रकारे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलाशी इतक्या प्रेमाने वागणाऱ्या या महिलेचे सगळे कौतुक करत आहेत.