Join us  

कुणी चुकीच्या पद्धतीने हात लावला तर काय करशील? शिक्षिकेने मुलांना सांगितले... कसे? व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 5:46 PM

Teachers Creative lesson on Good touch and bad touch video goes viral : कल्पक पद्धतीने मुलांना शिकवलेली गोष्ट त्यांच्या नक्कीच जास्त चांगली लक्षात राहते...

सध्याच्या काळात लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अगदी अनोळखी व्यक्तींपासून ते घरातील मंडळींपर्यंत कोणीही अशाप्रकारचा अत्याचार मुलांवर करु शकते. सध्या पालक नोकरीनिमित्त किंवा इतर काही कामानिमित्त मुलांना घरी आजीआजोबांकडे किंवा पाळणाघरात ठेवतात. अशावेळी कोणत्याही व्यक्तीकडून त्याना चुकीचा स्पर्श होण्याची शक्यता असते. पण हा स्पर्श चुकीचा आहे की बरोबर हे मुलांना ओळखता यावे यासाठी त्यांना त्याबाबत वेळीच माहिती देणे आवश्यक असते. चुकीच्या स्पर्शापासून मुलांना स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी पालक त्यांना थोडे कळायला लागले की लगेचच गुड टच आणि बॅड टच शिकवतात. इतकेच नाही तर मुलांच्या शाळेत, पाळणाघरातही याबाबतचे प्रशिक्षण आवर्जून घेतले जाते (Teachers Creative lesson on Good touch and bad touch video goes viral). 

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक शिक्षिका आपल्या वर्गातील मुलांना गुड टच आणि बॅड टच शिकवत आहे. अगदी ४ ते ६ वर्षाच्या या मुलांना ही शिक्षिका अंगाला चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने हात लावते. त्यावेळी मुलं तिचा हात झटकतात आणि असे करणे बॅड आहे हे तिला सांगतात. मुलांना नुसते सांगण्यापेक्षा कृती करुन दाखवली तर लवकर समजते हे यातून दिसून येते. जी मुले आणि मुली तिचा हात ढकलतात आणि तो बॅड टच आहे असे सांगतात त्यांचे ही शिक्षिका कौतुकही करताना दिसते. नंतर काही मुलींना उभे करुन ती बॅड टच शरीरावर कुठे कुठे असतो हेही सांगायला लावते. 

ट्विटवर हा २ मिनीटांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गुजरातमध्ये मानसिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. देवाशिष पालकर यांनीही यावर कमेंट केली असून भारतातील सगळ्या शाळांमध्ये अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर ही पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीने ही शिक्षिका प्रसिद्ध व्हायला हवी आणि भारतात सगळ्या शाळांमध्ये अशाप्रकारचे प्रशिक्षण द्यायला हवे असे म्हटले आहे. या व्हिडिओला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आले आहेत. काहींनी या व्हिडिओचे आणि शिक्षिकेचे कौतुक केले आहे तर काहींनी अशाप्रकारे कोणत्याही कारणाने मुलांना नको त्या ठिकाणी हात लावणे योग्य नाही असे नेटीझन्सनी म्हटले आहे.   

टॅग्स :सोशल मीडियाशिक्षक