Join us  

दिवाळीपूर्वी साफसफाईचं टेन्शन? पटकन घर चकाचक करण्यासाठी या १५ सोप्या खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 12:34 PM

दिवाळी म्हटलं की महिलांसमोरील सर्वात मोठे संकट म्हणजे घराची साफसफाई. पण हे संकट काही युक्त्या वापरुन नक्की सोडवता करता येऊ शकते, वाचा तर मग...

ठळक मुद्देदसऱ्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या साफसफाईचे टेन्शन घेऊ नकाकाही सोप्या युक्त्या वापरल्या तर तेच काम तुम्ही अधिक लवकर आणि चांगले करु शकताकोणाची मदत घ्यायला पुढे-मागे बघू नका

दसरा झाला आणि आता वेध लागले ते दिवाळीचे. दिव्यांचा हा सण साजरा करण्यासाठी आपण राहतो ते घर स्वच्छ नको का? दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. घर स्वच्छ, नीटनेटके दिसावे यासाठी केल्या जाणाऱ्या या साफसफाईचा सगळ्यात जास्त ताण असतो तो घरातील महिलावर्गाला. एकीकडे फराळाचे पदार्थ, पाहुणे, खरेदी, साफसफाई हे सगळे करता करता त्यांचा जीव मेटाकुटीला येतो. पण सणाचा ताण न होता तो आनंदी व्हायला हवा यासाठी साफसफाईचे पण योग्य ते नियोजन करायला हवे. त्यामुळे महिलांनाही सगळ्यांबरोबर सणाचा आनंद लुटता येईल आणि थकवा, आजारपण यापासून त्या दूर राहू शकतील. पाहूया साफसफाईसाठीच्या काही सोप्या टिप्स...

१. आपल्या घराच्या खोल्या, प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातील वस्तू यांचा अंदाज घेऊन कोणत्या दिवशी कोणत्या खोल्या साफ करायच्या हे आधीच ठरवून घ्या. 

२. साफसफाईला सुरुवात करताना आधी वरच्या बाजूची साफसफाई करावी, जेणेकरुन वर असलेली धूळ, जळमट खाली पडेल आणि खालचे साफ करताना ते निघून जाईल. 

३. साफसफाई करताना त्याठिकाणी आरसा, काचेच्या वस्तू, टिव्ही किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर त्या आधीच योग्य पद्धतीने झाकून ठेवाव्यात. जेणेकरुन साफसफाई करताना कोणतेही नुकसान होणार नाही. 

४. कपाटे किंवा ड्रॉवर आवरताना घरातील व्यक्तींची निश्चितच मदत होऊ शकते. इतर काम करुन थकलेले असाल त्यानंतर बसून हे कपाटातील कपडे आवरण्याचे काम तुम्ही करु शकता. 

५. पाण्याने साफसफाई करत असताना कुठे पाणी सांडले नाही ना याची खातरजमा करा, अन्यथा यावरुन पाय घसरुन पडू शकता. 

६. व्हॅक्युम क्लिनर, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करुन ठेवा जेणेकरुन ऐनवेळी साफसफाईचे सामान आणण्यासाठी बाजारात जावे लागणार नाही. बाजारात हल्ली काही खास ब्रश, मॉब उपलब्ध असतात, त्यामुळे तुमचे काम सोपे होऊ शकते. तेव्हा साफसफाई करण्याआधी एकदा बाजारात जाऊन आपल्याला सोयीच्या असलेल्या वस्तू आणा. 

७. वरच्या बाजूला चढताना फॅन न विसरता बंद करा. तसेच डोक्याला लागेल असे काही असेल तर योग्य पद्धतीने वर चढा.

८. पायाखाली घेतलेला स्टूल, खुर्ची किंवा शिडी यांचे पाय व्यवस्थित आहेत ना हे तपासून घ्या. अन्यथा ते पकडण्यासाठी कोणालातरी खाली उभे राहायला सांगा. 

९. साफसफाई करताना लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना दुसऱ्या खोलीत बसवा. अन्यथा त्यांच्या डोळ्यात काही जाऊ शकते. कधी धुळीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. 

१०. ओट्यावरील टाइल्स, बाथरुम साफ करताना साबणाचा फेस प्रमाणात घ्या. साबणाचा जास्त फेस झाल्यास त्यावरुन पाय घसरण्याची शक्यता असते. 

(Image : Unsplash)

११. घरात न लागणाऱ्या आणि अनेक वर्षे जपून ठेवलेल्या अशा असंख्य वस्तू असतात, या वस्तू लागत नसतील तर भंगारमध्ये टाका. अन्यथा नंतर लागतील असे म्हणून त्या वर्षानुवर्षे तशाच पडून राहतात.

१२. दारे-खिडक्या पुसत असताना पाण्यात किंवा कपड्यावर थोडे व्हीनेगर घ्या, त्यामुळे काचा आणि दरवाजे स्वच्छ निघण्यास मदत होईल. 

१३. न लागणारी, भांडी, कपडे, आंथरुणे, वह्या-पुस्तके काढून गरजू व्यक्तींना किंवा संस्थांना देऊन टाका. त्यामुळे घरातील जागा तर रिकामी होईलच. पण गरजू लोकांच्या चेहऱ्यावरही एक हसू आणण्यास आपण कारणीभूत ठरु शकतो. 

१४. कंबरेचा, पाठीचा किंवा इतर कोणता त्रास असेल तर अनावश्यक जड उचलणे, वाकणे अशाप्रकारची कामे करु नका. त्यामुळे साफसफाई तर होईल पण तुम्हाला सणाचा आनंद लुटता येणार नाही.  त्यामुळे शक्य त्या ठिकाणी घरातील पुरुष मंडळींची किंवा कामवाल्या मावशींची मदत घ्या.

१५. शक्य तिथे साफसफाई करताना हँडग्लोव्हज वापरा. त्यामुळे सतत हात ओले किंवा साबणात राहून त्वचेला त्रास होणार नाही. काही ठिकाणी कापण्याचीही शक्यता असते, पण ग्लव्हजमुळे हात वाचू शकतील, 

टॅग्स :सोशल व्हायरलदिवाळी