Join us  

डेकोरेशनचं टेन्शन? या घ्या घर सजविण्याच्या सोप्या पद्धती, दसऱ्यासाठी असं सजवा तुमचं घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 7:37 PM

सणासुदीला आपलं घर छान सजवलं की सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच वाढतो. पण घर सजवायचं हे ऐनवेळेला काही सुचत नाही, म्हणूनच तर या घ्या काही सोप्या टिप्स आणि असं सजवा तुमचं घर.....

ठळक मुद्देडेकोरेशन करायचं म्हणजे खूप काही वेगळं किंवा महागडं करावं, असं मुळीच नसतं. तुम्ही साध्या, सोप्या गोष्टी जरी कलात्मकतेने केल्या तरी सगळं खूप छान दिसतं.

सणवार म्हणजे आनंदाला उधाण. सणवाराचे दिवस असले की पाहुणे, नातलग, मित्रमंडळी अशा लोकांचं हमखास घरी येणंजाणं असतं. मग अशावेळी आपलं घर जर नीटनेटकं आणि छान सजवलेलं असेल, तर निश्चितच येणाऱ्या मंडळींनाही प्रसन्न वाटतं आणि मग त्यामुळे आपलंही समाधान होतं. शिवाय जोपर्यंत सणवाराच्या दृष्टीने आपण घरात काही बदल करत नाही किंवा काही सजावट करत नाही, तोपर्यंत आपणही फेस्टिव्ह मूडमध्ये जात नाही. म्हणूनच तर सणासुदीला जरा मस्त डेकोरेशन घरात केलंच पाहिजे. डेकोरेशन करायचं म्हणजे खूप काही वेगळं किंवा महागडं करावं, असं मुळीच नसतं. तुम्ही साध्या, सोप्या गोष्टी जरी कलात्मकतेने केल्या तरी सगळं खूप छान दिसतं.

 

कसं सजवायचं घर?१. रांगोळीपासून करा तयारसण म्हणजे दारात मस्त रांगोळी हवी. खास दसऱ्यासाठी जर रांगोळी काढण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर रंगांपेक्षा झेंडूच्या फुलांचा वापर करून रांगोळी काढा. यामुळे अगदी प्रवेश द्वारापासूनच तुमचं घर छान दिसू लागेल. झेंडूच्या पाकळ्यांनी जर एखादं फुल काढलं आणि त्याच्या अगदी मधोमध जर छोटीशी हिरव्या पानांनी बहरलेली कुंडी ठेवली तर तुमच्या रांगोळीचा लूक आणखीनच बदलतो आणि रांगोळी अजून हटके दिसते. 

 

२. प्रवेशद्वाराला लावा झेंडूच्या माळा आणि तोरणसणवाराला जर घराला आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर आपोआपच घर प्रसन्न दिसू लागतं. एक आंब्याचं पान आणि एक झेंडूचं फुल असं एकाआड एक करून जर तोरण बनवलं तर ते अधिक छान दिसतं. दाराच्या आजूबाजूला जर जागा असेल, तर तेथे झेंडूच्या माळा सोडा. एक माळ पिवळ्या झेंडूची तर एक केशरी झेंडूची असं केलं तरी खूप छान दिसेल.

 

३. असं काही वेगळं कराघराच्या बाहेर जर एखादा कॉर्नर असेल तर त्या कॉर्नरमध्ये एखादं छान रंग दिलेले मातीचे मटके ठेवा. हे मटके थोडंसं तिरकं असू द्या. या मटक्याच्या आता काही झेंडूच्या माळा ठेवा आणि त्या बाहेर सोडा. मटक्यातून झेंडूच्या माळा बाहेर येत आहेत, असा लूक आपल्या डेकोरेशनमधून दिसला पाहिजे, अशा पद्धतीने ते सजवा. यामुळे खराेखरंच खूप छान गेटअप येतो. 

 

४. हॉलमध्ये करा अशी सजावटवर सांगितलेली मटक्याची सजावट तुम्ही तुमच्या हॉलमध्येही एका कोपऱ्यात करू शकता. हॉलमध्ये मधोमध टिपॉयमध्ये एक छान आकर्षक तबक ठेवा. या तबकात पाणी टाका आणि त्या पाण्यात गुलाब पाकळ्या सोडा. या पाण्यात थोडे सेंट मारा. यामुळे घरात एक अनोखा सुगंध दरवळून राहील. सणासुदीला घरात रूम फ्रेशनर मारायला अजिबात विसरू नका.

 

५. घरातले कोपरे सजवाआपल्या घरात असे अनेक कोपरे असतात, ज्यांचा सजावटीसाठी खूपच छान उपयोग करता येतो. अशा कोपऱ्यांमध्ये तुम्ही फुलांनी भरलेले तबक ठेवू शकता. किंवा अशा कोपऱ्यांमध्ये एखादी शो चे झाड असणारी कुंडी ठेवा आणि त्या कुंडीभोवती खाली झेंडूची माळ लावा. असं काही केलं तरी ते खूपच छान आणि वेगळं वाटतं.

६. पुजेची थाळी पुजेची थाळी झेंडूच्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून सजवा. देवघराच्या बाजूला देखील फुलांच्या माळा लावा आणि देवघराला एक छान छोटेसे तोरण लावा. दिव्याभोवती देखील मोत्याच्या माळा गुंफा. यामुळे देवघराचा लूकही अधिक खुलेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलनवरात्री