Join us  

विद्यार्थ्याच्या घशात अडकले बाटलीचे झाकण, शिक्षिकेने प्रसंगावधान दाखवत वाचवले मुलाचे प्राण; पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 11:29 AM

मुले काय उद्योग करतील याचा नेम नाही, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून बाहेर काढणाऱ्या या शिक्षिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच...

ठळक मुद्देशिक्षकांना परिस्थिती हाताळता यावी यादृष्टीने योग्य ते प्रशिक्षण द्यायला हवे हे नक्की. शिक्षिकेचा हजरजबाबीपणा ठरला कौतुकास्पद

शालेय वयात मुले काय उपद्व्याप करतील याचा नेम नाही. कधी नाकात काहीतरी घालतात किंवा कधी आणखी काही. अनेकदा अशा गोष्टी करणे मुलांच्या जीवावर बेतणारे ठरु शकते. मात्र यावेळी मुलांसोबत असणाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे त्यांचा जीव वाचण्याची शक्यता असते. नुकताच अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आपण सगळ्यांनीच अशाप्रकारचे काही झाल्यास योग्य ती काळजी घ्यायला हवी हे यातून समोर येते. 

त्याचे झाले असे की, ९ वर्षाचा एक मुलगा वर्गात बसलेला असताना आपल्याकडे असलेली पाण्याची बाटली तोंडाने उघडण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात या बाटलीचे झाकण उघडले गेले खरे. पण ते थेट मुलाच्या घशात अडकले. झाकण अचानक घशात गेल्याने अस्वस्थ झालेला मुलगा धावत आपल्या वर्गशिक्षिकेकडे गेला. त्याच्या घशात झाकण अडकलेले असल्याने त्याला बोलता येत नव्हते. मात्र त्याने खुणेनेच आपल्या घशात काहीतरी अडकल्याचे शिक्षिकेला सांगितले. अशावेळी नेमके काय करायचे हे शिक्षकांना माहिती असायला हवे खरे. या शिक्षिकेने तत्परता दाखवत मुलाची छाती दाबण्याचा प्रयत्न केला जेणेकरुन दाब पडून ते झाकण तोंडातून बाहेर पडेल. या टेक्निकला हायमलिच मेन्यूवर टेक्निक असे म्हणतात. 

गुडन्यूज मूव्हमेंटस या इंन्स्टाग्रामवर पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत ३० लाख जणांनी तो पाहिला आहे. न्यू जर्सीमध्ये एका शाळेतील तिसरीमध्ये शिकणाऱ्या रॉबर्ट या मुलाबाबत हा प्रकार घडला असून शिक्षिकेच्या हजरजबाबीपणामुळे या मुलाचे प्राण वाचले आहे. या शिक्षिकेने आपतकालिन स्थितीत कोणत्या प्रकारची टेक्निक वापरायची याबद्दलचे ट्रेनिंग घेतलेले असल्याने ती या प्रसंगात प्रसंगावधान दाखवू शकली. तिच्या या कृत्याबद्दल नेटीझन्सनी तिचे कौतुक केले आहे. त्यामुळे मुलांनी शाळेत असे काही प्रकार केल्यास शिक्षकांना परिस्थिती हाताळता यावी यादृष्टीने योग्य ते प्रशिक्षण द्यायला हवे हे नक्की. 

टॅग्स :सोशल व्हायरलशिक्षकविद्यार्थी