मुक्या प्राण्यांना लळा लावला तर ते देखील आपल्यावर जीव लावतात. याचा प्रत्यय आपल्याला क्षणा क्षणाला दिसून येतो. मुके प्राणी माणसांपेक्षा अधिक निष्ठावंत असतात. त्यांना आपल्याला सांभाळणारे मालक अचूक लक्षात राहतात. पाळीव प्राण्यांना आपल्या मालकांप्रती प्रचंड प्रेम असतं. त्यांच्यासाठी मालकाचे संरक्षण करणे हेच पाहिले आणि अंतिम कार्य असते. असाच एक प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन सिंह चक्क एका महिलेला मिठी मारून भावुक झाले आहेत. हा एका प्राणी संग्रहालयातील व्हिडीओ असल्याचे समजत आहे. यामध्ये दोन सिंह महिलेला पाहताच एवढे आंनदी होतात, की चक्क एखाद्या लहानग्या प्राण्यांसारखे उड्या मारून बागडू लागतात.
मालकिया पार्क बिग कॅट्स रेस्क्यूने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. या छोट्याश्या क्लिपमध्ये, दोन सिंह त्यांची मालकीण मायकेला झिमानोव्हाकडे धावताना दिसून येत आहे. रिपोर्ट्सनुसार, मायकेलाने माल्किया आणि अॅडेले नावाच्या दोन सिंहांना दक्षिण आफ्रिकेतील खंदकातून वाचवले. त्यानंतर या महिलेने त्यांची लहानपणापासून देखभाल केली. हे सिंह मोठे झाल्यानंतर तिने त्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवले. तब्बल ७ वर्षानंतर ही महिला त्या सिंहांना भेटण्यासाठी प्राणी संग्रहालयात गेली. तिथे पोहोचताच सिंह आनंदाने भावुक झाले.
सिंहाला पाहिलं की आपण लगेच पळ काढतो. भलभल्यांचे त्यांच्यासमोर धाबे दणाणतात. सिंहाची डरकाळी एकताच माणूस तिथेच बेशुद्ध पडतो. मात्र, या ठिकाणी एका महिलेच्या जवळ सिंह पळत येऊन तिला मिठी मारत आहेत. तिला कुरवाळुन जवळ घेत आहे. यावरून हे निदर्शनास येते की इतकी वर्ष झालीत तरी देखील आपल्या मालकिणीला सिंह विसरलेले नाहीत. त्यांच्यामध्ये एक प्रेमळ बाँडिंग तयार झालं आहे. सिंहाचे हे प्रेमळ स्वरूप पाहून अनेकांनी या व्हिडिओचं कौतुक केलं आहे.