Join us  

विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 2:23 PM

Social Viral: मी ही कधीकाळी ​​​​alopecia areata या आजाराने हैराण झाले हाेते.. त्यावेळची मानसिक, भावनिक परिस्थिती खरोखरंच खूप त्रासदायक होती.. असं सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy)... वाचा सविस्तर, तिला नेमकं झालं होतं तरी काय..

ठळक मुद्देआता मी या आजारातून बरी झालेली असले तरी माझा हा आजार कधीही उफाळून येऊ शकतो, याची भीती मला कायमच आहे,

मागील २ दिवसांपासून सतत एक विषय चर्चेत आहे.. अभिनेता विल स्मिथ, alopecia areata या आजाराने त्रस्त असणारी त्याची (Will Smith) पत्नी, आजारपणामुळे आलेल्या शारिरीक व्यंगावर ऑस्करसारख्या (oscar award) सोहळ्यात विनोद करणारा अभिनेता ख्रिस रॉक (Chris Rock) आणि त्यामुळे चिडलेल्या विल स्मिथने सगळ्या जगासमोर त्याला दिलेली एक सणसणीत चपराक... हा एक प्रसंग अवघ्या काही मिनिटांत घडून गेला, पण त्यामुळे मात्र अख्ख्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आपण मराठीमध्ये ज्याला चाई पडणे असे म्हणतो, हाच आजार विल स्मिथची पत्नी जॅडा हिला झालेला आहे हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे.. काही वर्षांपुर्वी याच आजाराची शिकार झाली होती अभिनेत्री समीरा रेड्डी...(Sameera Reddy suffers from alopecia)

 

जे सत्य आहे ते आहे.. ते का उगाच सगळ्यांपासून लपवून ठेवायचं.. हा समीरा रेड्डीचा फंडा.. त्यामुळे जे तिच्या बाबतीत घडतं, ते ते सगळं ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. ना ती जाड असल्याचा बाऊ करते ना केस पांढरे झाल्याचं सगळ्यांपासून लपवून ठेवते.. आताही तिने हेच केलं.. सध्या गाजत असलेला alopecia आजार तिलाही झाला होता, त्यातून बाहेर पडताना तिची झालेली मानसिक, भावनिक घालमेल, हे सगळं तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून शेअर (instagram share) केलं आहे..

 

ही पोस्ट शेअर करताना समीरा म्हणते की सध्या जगभरात चालू असलेली चर्चा ऐकून मलाही माझा अनुभव शेअर करावा वाटतो जेणेकरून त्यातून इतरांना काहीतरी सकारात्मक वाटेल. २०१६ साली मला स्वत:ला हा आजार झाला होता. नवरा अक्षय याने तिच्या डोक्यावर जवळपास २ इंच आकाराचे टक्कल पाहिले. नंतर लगेचच महिना भरातच मला डोक्यावर आणखी २ ठिकाणी टक्कल पडल्याचे दिसले. हा एक खरोखरंच मोठा धक्का होता आणि तो पचवणं कठीण होतं. हा आजार कुणाला आजारी पाडत नाही किंवा तो संसर्गजन्यही नाही, पण त्यामुळे बसणारा मानसिक, भावनिक आघात मात्र खूप खूप मोठा असतो, असंही समीरा या पोस्टमध्ये म्हणतेय. 

 

केस गळत आहेत किंवा गळाले आहेत, आपल्या डोक्यावर टक्कल दिसतंय, हेच या आजाराची सगळ्यात मोठी भीती. त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की बऱ्याचशा केसेसमध्ये हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकतो. इंजेक्शन्स आणि योग्य औषधोपचार यामुळे नवे केस आले आणि हळूहळू माझ्या डोक्यावरचे हेअर लॉस पॅचेस गेले. आता मी या आजारातून बरी झालेली असले तरी माझा हा आजार कधीही उफाळून येऊ शकतो, याची भीती मला कायमच आहे, असंही ती म्हणाली. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसमीरा रेड्डीइन्स्टाग्रामऑस्करकेसांची काळजी