आई-वडिलांकडे पाहून आपण लहानपणापासून अनेक गोष्टी शिकत असतो. आईवडिल आपल्यावर जन्मापासून संस्कार करत असतात. आपण अभ्यास करावा, शिकून मोठे व्हावे यासाठी ते कायम धडपडत असतात. आईचे हेच संस्कार लक्षात घेऊन गुजरातच्या राजकोटमधील शिवांगी बागथरिया हिने लग्नाच्या ऐन मुहुर्तावरच तिचा परीक्षेचा पेपर दिला. लग्न की पेपर या द्वंदात तिने आधी पेपर निवडला. बोहल्यावर उभं राहाण्याआधी शिवांगीनं परीक्षेचा हॉल गाठला. लग्न असतानाही आधी प्राधान्य परीक्षेला देणाऱ्या शिवांगीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर लग्नाचा मेकअप करुन परीक्षा देण्याचा देखावा कशाला करायचा म्हणून तिला ट्रोलही करण्यात आलं. मात्र लग्न आधीच ठरलं होतं आणि परीक्षेचं वेळापत्रक नंतर जाहीर झालं त्यामुळे वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने तिने लग्नाच्या पेहरावातच परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपर दिला. याची प्रेरणा तिला तिच्या आईकडून मिळाल्याचे ती सांगते.
शिवांगी सांगते, ‘ आईचे वडिलांशी लग्न झाले तेव्हा ती महाविद्यालयात सेकंड इयरला शिकत होती. त्यानंतरच काही दिवसांत ती गर्भवती राहिली त्यामुळे तिला अभ्यास थांबवावा लागला. पण तिला अभ्यास सोडायचा नव्हता, तिला शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणून मी थोडी मोठी झाल्यावर तिने पुन्हा शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मी आठ वर्षांची होते तेव्हा ती परीक्षा देत होती. मी आणि माझा भाऊ परीक्षा केंद्राच्या बाहेर तीन तास तिची वाट बघत थांबायचो. तेव्हापासून शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे असेत हे माझ्या मनात कायम बिंबवले गेले.
माझी आई माझ्या शाळेची मुख्याध्यापिका होती त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत ती कायम कठोर असायची. पदवी परीक्षेनंतर मला माझी स्वत:ची सामाजिक संस्था सुरू करायची होती आणि आईवडिलांनी शिकवल्याप्रमाणे मला समाजाला काहीतरी परत करायचे होते. कोरोना काळातही माझ्या वडिलांनी घरोघरी जाऊन लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे हे लक्षात घेऊन मदत केल्याचेही शिवांगी सांगते. लग्न ठरल्यावर मी माझ्या होणाऱ्या पतीला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितले आणि त्यानीही मला चांगली साथ दिली. सासरच्यांनी दिलेल्या साथीमुळेच मी लग्नाच्या दिवशीही परीक्षेचा पेपर देऊ शकले असेही ती पुढे म्हणाली.