गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने यंदा राज्यभरात गणपती उत्सव अतिशय उत्साहात पार पडल्याचे आपण पाहिले. म्हणता म्हणता 10 दिवस संपले आणि आज बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला. बाप्पाला वाजतगाजत आणि ढोलताशांच्या गजरात निरोप देताना या मिरवणुका पाहण्यासारख्या असतात. आपल्या गावाला निघालेल्या बाप्पाचे अखेरचे दर्शन घेणे हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग असतो. इतकेच नाही तर पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी तर या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा त्या पाहण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर येतात. दिवसभर मिरवणूक पाहायला बाहेर पडणे हे कितीही थकवणारे असेल तरी त्या दिवशी आपल्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत असताना आपली काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक पाहायला जाणार असाल तर आपल्यासोबत असायलाच हव्या अशा 4 गोष्टी कोणत्या ते पाहूया (Thing to Carry While Going for Ganpati Visarjan)..
1. पाणी
सध्या वातावरण सारखं बदलत आहे, अशामध्ये आपल्याला सतत तहान लागू शकते. मिरवणुकीदरम्यान आपण गर्दीमुळे जास्त थकतो, त्यामुळे शरीर डीहायड्रेट होण्याची शक्यता असते. अशावेळी सतत पाणी पिणे आवश्यक आहे. नाहीतर उन्हामुळे चक्कर येणे, थकव्यामुळे आणखी काही त्रास होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
2. स्कार्फ किंवा टोपी
उन्हापासून डोक्याचे संरक्षण व्हावे यासाठी आपल्याकडे स्कार्फ किंवा टोपी अवश्य असायला हवी. स्कार्फचा तर तोंड पुसायला, अंगाभोवती गुंडाळायला असा कोणत्याही गोष्टीसाठी उपयोग होऊ शकतो.
3. कोरडा खाऊ
विसर्जन मिरवणूक पाहताना आपण पार दंग होऊन जातो. तसेच यावेळी आपण खूप चालतो त्यामुळे दमणूक होते. अशावेळी आपल्याला भूक लागली आहे हेही आपल्या लक्षात येत नाही. मात्र खूप भूक लागली आणि शरीराला एनर्जी मिळाली नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे किमान चॉकलेट, एनर्जी बार, बिस्कीट असा लहानसा कोरडा खाऊ अवश्य जवळ ठेवावा.
4. पैसे
हल्ली आपण सगळी कामे फोनवरच करतो. मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेकदा फोन, पाकीट चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. अशावेळी आपल्याला खाण्यासाठी, घरी पोहोचण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे पाकीट आणि फोन जवळ असेल तरीही एखाद्या खिशात थोडे पैसे मुद्दाम ठेवायला हवेत.