पोलिस स्टेशन म्हणजे लहान मुलांसाठी भिती दाखवण्याची गोष्ट असते. याठिकाणी बसणारे पोलिस काका हातात दंडुक घेऊन आपल्याला शिस्त लावण्यासाठी असतात इतकेच त्यांना माहित असते. त्यामुळे पालकही अनेकदा आपल्या लहान मुलांना पोलिसांची भिती दाखवतात. कधी घरात एखादी चोरी झाली किंवा काही चुकीची गोष्ट घडली की आपण लगेच जाऊन पोलिसांकडे तक्रार करतो. पण एका ३ वर्षाच्या लहान मुलाने चक्क पोलिस स्टेशनला जाऊन आपल्या आईची तक्रार केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे (Three Year Old Kid Complains Against His Mummy at Police Station Viral Video).
आता हा मुलगा आपल्या आईची तक्रार का करतो, तक्रारीत तो काय माहिती देतो हे व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणे काहीसे मजेशीर आहे. खेळता खेळता हा लहानगा समोर बसलेल्या पोलिस महिलेला आपल्या आईची तक्रार करतो. विशेष म्हणजे आपण एखादी तक्रार द्यायला गेल्यावर पोलिस ज्याप्रमाणे ती तक्रार नोंद करुन घेतात, त्याचप्रमाणे ही महिलाही मुलाने दिलेली तक्रार एका कागदावर लिहीत असल्याचे दिसते. आता अशाप्रकारे आईची तक्रार करण्याचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आई आपल्याकडचे सगळे चॉकलेट चोरुन घेते असे या लहानग्याचे म्हणणे आहे. या रागात तो पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपल्या आईची पोलिसांकडे तक्रार करतो. हा मुलगा तक्रार करुन थांबत नाही तर ती अशाप्रकारे चॉकलेट चोरते म्हणून तिला जेलमध्ये टाका अशी मागणीही तो पोलिसांकडे करतो.
मम्मी के खिलाफ शिकायत लिखाने थाने पहुंचा तीन साल का मासूम बोला- मेरी मम्मी चोरी करती हैं मेरा चॉकलेट, जेल में डाल दो, देखें वायरल वीडियो pic.twitter.com/NwWbvz1Bmo
— Priya singh (@priyarajputlive) October 17, 2022
आई आणखी काय काय करते असे महिला पोलिस विचारत असताना निरागसपणे हा मुलगा सगळे सांगताना दिसतो. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एका दिवसांत जवळपास ३७ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. अनेकांनी तो रिट्विट केला असून यावर नेटीझन्सनी बऱ्याच प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या लहानग्याच्या निरागसतेमुळे आणि इतकी अक्कल असल्याच्या गोष्टीमुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आता ही घटना नेमकी कुठे घडली हे मात्र व्हिडिओवरुन समजू शकलेले नाही.