नवमी- दसऱ्याचा कुलाचार, दिवाळीत लक्ष्मीपुजनाचा स्वयंपाक किंवा घरात काही ना काही कारणांमुळे होणारा पुरणा-वरणाचा स्वयंपाक (Puran swaipak) करायचा म्हटलं की अनेक जणींना टेन्शन येतं. टेन्शन येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेची कमतरता. पुरेसा वेळ हाताशी असेल, तर पुरणाचा स्वयंपाक तेवढा जड जात नाही. पण वर्किंग वुमनला मात्र मोजक्या वेळेत पुरणाचा स्वयंपाक, देवपुजा करून वेळेवर ऑफिस गाठायचं असतं. म्हणूनच दिड- दोन तासांत पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल, तर काही गोष्टींची तयारी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवा (Cooking Tips). ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि भराभर स्वयंपाक उरकला जाईल (Puran swaipak for festivals in just 1 hour).
पुरणा- वरणाचा स्वयंपाक झटपट होण्यासाठी टिप्स
१. सगळ्यात आधी तर भांड्यांची जुळवाजुळव रात्रीच करून ठेवा. दोन- तीन कढई, पुरणाचा एक कुकर आणि वरण- भाताचा एक कुकर, चार दोन पातेले, तवा, पळ्या, चमचे असं सगळं रात्रीच वेगळं काढून चटकन हाताला येईल, यापद्धतीने ठेवून द्या.
२. ओटा आदल्यादिवशीच आवरून एकदम चकाचक करून ठेवा. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ओट्याची स्वच्छता करण्यात अजिबात वेळ जाणार नाही.
३. पुरणाच्या जेवणात एक पालेभाजी आणि एक फोडभाजी असते. जेवायला माणसे किती लागणार या हिशोबाने भाज्या किती लागतील, ते आदल्या दिवशीच ठरवून ठेवा. पालेभाजी निवडून ठेवा. पालेभाजीसोबतच मिरचीची देठे काढून ठेवा, कोथिंबीर निवडून ठेवा. कढीपत्ता तयार ठेवा.
४. कोशिंबीरीसाठी लागणारी टाेमॅटो, काकडी धुवून, पुसून कोरडी करून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी या कामात वेळ लागणार नाही.
५. पुरण किती लागणार आहे, त्या हिशेबाने डाळ मोजून भांड्यात टाकून ठेवा. त्या मापानुसार पुरणात गूळ- साखर किती लागणार, ते सुद्धा वेगळ्या भांड्यात काढून ठेवा.
६. त्याचप्रमाणे वरण- भातासाठी डाळ- तांदूळही मोजून वेगळ्या भांड्यात काढून ठेवा.
७. भजी करायला किती पीठ लागणार, कणिक किती लागणार, हे सगळंही आदल्या दिवशीच मोजून ठेवा.
८. धनेपूड- जिरेपूड रात्रीच करून ठेवा आणि तिखट, मीठ, मसाले, हिंग, मोहरी, जिरे सगळं चटकन हाताशी येईल, यापद्धतीने ठेवून द्या.