उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला प्रचंड उकडत असतं. त्यामुळे एकतर आपण फॅनखाली बसतो किंवा एसी, कूलर असं काही ना काही लावून आपल्या आजुबाजूची हवा थंड राहील यासाठी प्रयत्न करतो. कितीही प्रयत्न केले तरी खिडक्या, गॅलरी यांतून ही गरम हवा आणि झळा घरात येतात आणि आपल्याला उकडतंच. ऑफीसमध्येही अनेकदा असंच होतं. यातही घर किंवा ऑफीस सगळ्यात वरच्या मजल्यावर असेल तर टेरेस उन्हाने तापते आणि आपला जीव उकाड्याने अगदी नकोसा होऊन जातो. एकवेळ अशी येते की आपल्याला फॅन आणि एसीची हवाही नको होते आणि मोकळी हवा हवीहवीशी वाटते. घरात हवा खेळती राहावी आणि घर त्यातल्या त्यात गार राहावं यासाठी करता येतील असे काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे उन्हाळा काही प्रमाणात का होईना सुसह्य होईल (Tips For Home Cooling In Summer).
१.घराच्या आजुबाजूला हिरवाई राहील याची काळजी घ्या
हिरवा रंग हा डोळ्यांना शीतलता देणारा असतो. त्यामुळे आपण सतत स्क्रीनसमोर असलो की थोड्या वेळाने झाडांच्या हिरव्या रंगाकडे पाहायला हवे असे आपल्याला आवर्जून सांगितले जाते. त्यामुळे घराच्या बाल्कनीत, खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा अगदी घराच्या दारात उन्हाळ्याआधी जास्तीत जास्त झाडे लावा. इतकेच नाही तर सध्या बाजारात अनेक इनडोअर प्लांटस पण मिळतात. किचनमध्ये हॉलमध्ये आणि बेडरुममध्येही ही झाडे आपण सहज लावू शकतो. त्यामुळे घर दिसायलाही छान दिसते आणि या झाडांमुळे आणि त्यातील ओलसर मातीमुळे घरात थंडावा राहण्यास मदत होते.
२. छतावर किंवा गॅलरीत पाणी मारा
आपल्या घराला एखादी छोटीशी गॅलरी असेल तर किंवा आपल्या छतावर टेरेस असेल तर त्याठिकाणी आवर्जून पाणी मारा. खिडकीच्या बाहेर ग्रील किंवा मोकळी जागा असेल तर त्याठिकाणीही पाणी मारता येईल. पाण्यामुळे गरम हवेचा दाह कमी होण्यास मदत होईल थंडावा मिळेल.
३. एक्झॉस्ट वापरा
घराच्या आतील गरम हवा काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. घरातील हवा आतल्या आत फिरत राहिल्याने घर आहे त्यापेक्षा जास्त गरम होते. अशावेळी एक्सॉस्टचा वापर केल्यास घरातील हवा बाहेर जाऊन घरात हवा खेळती राहील आणि घर गार राहण्यास मदत होईल. स्वयंपाकघरात गॅसमुळे आणि बाथरुम फार बंद असल्याने तिथे जास्त गरम होते. प्रामुख्याने स्वयंपाकघर, बाथरुम अशाठिकाणी एक्सॉस्टची सोय करुन घ्या. यामुळे घरातील वातावरण थंड राहण्यास खूप मदत होईल.
४. टेबल फॅन, कूलरसमोर बर्फ किंवा पाणी ठेवा
तुम्ही टेबल फॅन किंवा कूलर वापरत असाल तर त्याच्या समोर एका भांड्यात बर्फाचे खडे किंवा गार पाण्याने भरलेले भांडे ठेवा. यामुळे नकळत आजुबाजूची हवा थंड होण्यास मदत होईल. वाऱ्याने या पाण्याचे तुषार उडले तरी गार छान वाटेल.