नॉन स्टीक तवा किंवा पॅन आपण नियमितपणे वापरतो. डोसा, धिरडे करण्यासाठी किंवा झटपट एखादा पदार्थ करण्यासाठी या भांड्यांचा घरोघरी वापर केला जातो. पण भरपूर पैसे देऊन आणलेली हे नॉन स्टीक तवा किंवा पॅन काही दिवसांत खराब होतात आणि त्याच्यावर बाजुने थर जमा व्हायला लागतो. इतकेच नाही तर काही दिवसांतच या तव्याचे कोटींग निघायला आणि खराब होते आणि डोसा किंवा धिरडे तव्यावर चिकटायला लागतात. मात्र असे होऊ नये आणि दिर्घकाळ हा नॉन स्टीक पॅन आहे तसा चांगला राहावा यासाठी काय करायचं याविषयी काही सोप्या टिप्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याशी याविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करतात, पाहूया या टिप्स कोणत्या (Tips To Maintain Nonstick Cookware)...
१. कोमट पाणी या तव्यावर किंवा पॅनमध्ये घालून त्यात साबण घालून ठेवा, त्यानंतर तवा हलक्या हाताने स्वच्छ करा. त्यामुळे तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होईल.
२. या तव्यासाठी कायम लाकडी किंवा सिलीकॉनचे उलथने वापरावे. काही वेळा आपण घाईत स्टील किंवा अन्य धातूचे उलथने वापरतो ज्यामुळे तवा खराब होण्याची शक्यता असते.
३. नॉन स्टीक पॅनमध्ये खूप मोठ्या गॅसवर काहीही करु नका. नॉन स्टीक वापरताना गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवा म्हणजे हा तवा खराब होणार नाही.
४. पॅन गरम असताना तो धुवू नका, कारण त्यामुळे त्याचा वरचा थर खराब होण्याची शक्यता असते. तवा पूर्ण गार होऊद्या आणि मगच धुवा.
५. नॉन स्टीक घासण्यासाठी माईल्स लिक्विड सोप आणि स्पंज पुरेसा असतो. कोमट पाण्यात लिक्विड सोप घालून मग स्पंजने हलक्या हाताने हा तवा किंवा पॅन घासल्यास तो सहज स्वच्छ होतो. तारेची घासणी तव्याला अजिबात लावू नका, त्यामुळे तव्याचे कोटींग खराब होते.
६. तवा धुवून झाल्यानंतर तो ठेवताना त्याला न विसरता २ थेंब तेल लावून ठेवा. त्यामुळे हा तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते.
७. काही वेळा या तव्याला तेलाचे किंवा अन्य कोणते थर जमा होतात आणि ते साचत जातात. अशावेळी बेकींग सोडा आणि पाणी एकत्र करुन हा तवा स्पंजने साफ करावा. त्यामुळे हे थर निघून जाण्यास मदत होते.