लहान मुलं आपल्या कल्पनेपलिकडे समजूतदार असतात. ती लहान आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही असं आपल्याला वाटत असतं. मात्र त्यांची समज इतकी जास्त असते की अनेकदा त्यांच्या वागण्यातून ते आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. काही लहान मुलं तर त्यांच्या वयाच्या मानाने खूपच लवकर प्रगल्भ होतात. त्यांची एखादी कृती पाहून ते इतक्या कमी वयाचे असून त्यांना अमुक एक गोष्ट कशी सुचली असेल असा प्रश्न पालकांना पडतो. पण त्यांची आकलन शक्ती इतकी जास्त असते की त्यांना न सांगता, न शिकवता अनेक गोष्टी ते केवळ पाहून किंवा आपल्या समजुतीने शिकतात (Viral Video of Toddler helping Father).
सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहानगे बाळ आपल्या वडिलांना बसायला मदत करत असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये लहान बाळाचे वडील कुबडीचा आधार घेऊन चालत असल्याचे दिसते. त्यांच्या एका पायाला फ्रॅक्टर असल्याचेही यामध्ये दिसत आहे. वडिल मुलाच्या दिशेने येत असल्याचे पाहून हे बाळ डायनिंग टेबलच्या जवळची खुर्ची बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. इतकेच नाही तर वडिल बसल्यानंतर त्यांच्या हातातील काठीही अतिशय निरागसपणे घेण्याचा प्रयत्न करते. यावरुन या लहानग्या पिल्लाला आपल्या वडिलांची किती काळजी आहे ते सहज दिसून येत आहे.
इन्स्टाग्रामवर प्युबिटी या पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला २० लाख व्ह्यूज मिळाले असून या चिमुकल्या बाळाचे सगळे कौतुक करताना दिसत आहेत. व्हॉट अ ग्रेट हेल्पर, हृदय हेलावणारा व्हिडिओ असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या असून सगळे जण या बाळाचे कौतुक करताना दिसत आहेत. नुकतेच चालायला लागलेले हे बाळ अगदी गोड दुडूदुडू चालत आहे. पण आपल्या वडिलांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांना मदत करण्याची त्याची पद्धत खूपच गोंडस आहे.