सोशल मिडीयावर सध्या ट्रान्स - कपलची चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ट्रान्समॅन गरोदर असल्याच्या बातम्यांनी इंटरनेट गाजवलं. याच कपलची आणखी एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरली आहे. केरळचे हे ट्रान्स - कपल नुकतेच आई - बाबा झाले आहेत. ट्रान्समॅनने एका बाळाला जन्म दिला असून, त्यांनी यासंदर्भातील माहिती सोशल मिडीयावर शेअर केली आहे. हे कपल भारतातील पहिले ट्रान्स - कपल ठरले असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केरळच्या कोझिकडमधील जहाद आणि जिया पावल हे एक ट्रान्स - कपल आहे. जिया पुरुष म्हणून तर जहाद महिला म्हणून जन्माला आले. पण आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून जिया महिला आणि जहाद पुरुष बनला आहे. जिया आणि जहाद हे दोघेही गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहतात. जियाने याआधी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ''मी जन्माने किंवा शरीराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.''
यापूर्वी या कपलने मुल दत्तक घेण्याची तयारी केली होती. यासंदर्भात त्यांनी संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. परंतु, कायदेशीर प्रक्रिया त्यांची पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत होते. ट्रान्सजेंडर कपल असल्यामुळे त्यांना या समस्येला सामोरे जावे लागत होते. अखेर त्यांनी निर्णय बदलला आणि स्वतःचे बाळ या जगात आणण्याचा निर्णय घेतला. जहादने प्रेग्नेंसीसाठी आपली ट्रान्समेन बनण्याची शस्त्रक्रिया थांबवली. शरीरातील गर्भाशय आणि इतर अवयव तसेच ठेवले, त्यामुळे गर्भधारणेत यश आलं आणि तो प्रेग्नंट झाला.
८ फेब्रुवारी २०२३ रोजी जहादची डिलीव्हरी झाली आणि त्याने बाळाला जन्म दिला. त्या बाळाचे लिंग सध्या गुपित ठेवण्यात आले आहे. त्या बाळाचं वजन २.९२ किलो इतके आहे. अशी माहिती जियाने दिली आहे. जियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गूड न्यूज शेअर केली आहे. तिने त्यांच्या बाळाचा पहिला फोटोही शेअर केला आहे. तसंच तिने तिला साथ देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत.
जहाद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समॅन ठरला आहे. सर्जरीवेळी जहादने दोन्ही ब्रेस्ट काढून टाकले होते. त्यामुळे बाळाला ब्रेस्ट मिल्क बँकेतून दूध देणार असल्याचं जियाने सांगितलं आहे.