Join us  

बंगालहून न्यूझीलंडला प्रवास करत पोहचली दुर्गामाची मूर्ती, 1,80,000 रुपये खर्च, त्या प्रवासाची थरारक गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:20 AM

न्यूझीलंडमध्ये भारतीयांनी साजऱ्या केलेल्या दुर्गा पुजेच्या उत्सवात भक्तांनी पुजेचा, प्रसादाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला, या सर्व कार्यक्रमाचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडियो

ठळक मुद्देन्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च या भागात या पूजेचे आयोजन करण्यात आले होतेकोलकाताहून कोलंबो, बँकॉक, चीन, मेलबर्न आणि अखेर न्यूझीलंडमधील ऑकलंड याठिकाणी पोहोचली

नवरात्रीत केली जाणारी दुर्गा पूजा भारताच्या अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. इतकेच नाही तर जगातही दुर्गापूजेला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. परदेशात असणारी भारतीयांची वाढती संख्या हे यामागील मुख्य कारण आहे. नुकताच न्यूझीलंडमधील दुर्गापुजेचा एक व्हिडियो समोर आला आहे. न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च या भागात या पुजेचे आयोजन करण्यात आले होते. बंगालमधून न्यूझीलंड येथे स्थायिक झालेल्या नागरिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच इतर राज्यातील भारतीयांचाही यामध्ये समावेश असू शकतो. अशाप्रकारच्या पुजेचे आयोजन ख्राइस्टचर्च याठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आल्याने भक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. 

आता दुर्गा पूजा म्हटल्यावर दुर्गा मातेची मूर्ती तर आलीच. आता न्यूझीलंडमध्ये मूर्ती कशी मिळणार म्हणून या दुर्गा मातेच्या भक्तांनी थेट भारतातून मूर्ती मागवली. अतिशय रेखीव आणि सुबक अशी ही मूर्ती कोलकाताहून न्यूझीलंडला पाठवण्यात आली. खास बंगाली पद्धतीची पांढऱ्या आणि लाल रंगाची ही मूर्ती अतिशय देखणी आहे. समुद्रमार्गाने याठिकाणी आणण्यात आलेली ही दुर्गा मातेची मूर्ती मोठा दूरचा प्रवास करुन आली आहे. कोलकाताहून कोलंबो, बँकॉक, चीन, मेलबर्न आणि अखेर न्यूझीलंडमधील ऑकलंड याठिकाणी पोहोचली. समुद्री मार्गोने जहाजातून आणण्यात आलेली ही मूर्ती  ख्राइस्टचर्चपर्यंत एका ट्रकमधून आणण्यात आली. या मूर्तीचा आकार बराच मोठा असल्याचे आपल्याला व्हिडियोमध्ये पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर अशा या मूर्तीची किंमत जवळपास ९५ हजार रुपये असून ती भारतातून न्यूझीलंडला पाठवण्यासाठीही साधारण तेवढाच खर्च आला आहे. त्यामुळे या मूर्तीची एकूण किंमत जवळपास १,८०,००० रुपये इतकी झाली आहे. 

(Image : YouTube)

न्यूझीलंडमध्ये राहणारे भारतीय नागरिक विशेषत: बंगाली लोक याा पूजाचे आणि तेथील प्रसादाचा आनंद लुटताना दिसत आहेत. देवीची आरती, स्त्रोत्र यांचा जयघोष याठिकाणी सुरु आहे. देवीची पारंपरिक पद्धतीने पूजाही केल्याचे दिसते. महिलांचा यामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग असल्याचे चित्र आहे. तसेच पूजेनंतर याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याचे व्हिडियोमध्ये पाहायला मिळते. यामध्ये लहान मुलींची नृत्ये, गाणी, वादन अशा विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या सादरीकरणामध्ये भाग घेतला असून ते या दुर्गा मातेच्या पूजेचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे परदेशी नागरिकांनीही या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतल्याचे दिसत आहे. हे नागरिक ड्रमवर काही बोल वाजवत असून त्यावर भारतीय नागरिक नृत्य करत आहेत. त्यामुळे एकूणच विविध संस्कृतींचा मिलाप याठिकाणी झाला असे आपण म्हणू शकतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलनवरात्रीन्यूझीलंड