कोण कोणत्या क्षेत्रात आणि कसं करिअर घडवेल, याचा काही नेम नाही. असंच काहीसं घडलं इंग्लंडच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत. पोलीसाची नोकरी लागली म्हणून सुरूवातीला स्वारी भारीच खुश असायची. नोकरी करत करत छंद जोपासणं पणु सुरू होतं. पण त्यानंतर मात्र तिचा छंद तिच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या डोळ्यात येऊ लागला. त्यांना नाही आवडायचं म्हणे छंद म्हणून तिचं असं काय काय करणं... म्हणून सगळ्यांची तिच्यावर कायम खप्पा मर्जी... म्हणून मग एक दिवस ती वैतागली आणि सरळ नोकरी सोडून दिली. आज हीच महिला पोलीस अधिकारी आज इंग्लंडमधली प्रसिद्ध इंस्टास्टार (instastar) बनली आहे म्हणे.
तिची ही गोष्टी आहेच मुळी खास. लीन कार (Leanne Carr)असं तिचं नाव. लीन सध्या ३६ वर्षांची आहे. पोलीस म्हणून इंग्लंडच्या पोलीस खात्यात रुजू झालेल्या लीन ला भटकंतीची (travelling)भारीच आवड. नोकरीचे तास संपले की ती तिची मुक्त असायची. मन म्हणेल तिकडे फिरून यायची. तिचा हा छंद तिला अजिबातच शांत बसू द्यायचा नाही. कधी दूर भटकून येण्याची इच्छा झाली तर सरळ रजा टाकायची आणि मस्तपैकी फिरून यायची. बाहेर कुठेही गेलं की आपण कुठे गेलो, काय केलं, कुठे जेवलो, कुठे राहिलो, हे सगळं सगळं सोशल मिडियावर (social media)शेअर केल्याशिवाय अनेक जणींना चैन पडत नाही. तसंच काहीसं लीनचंही होतं. ती देखील फिरून आल्यावर असंच सगळं करायची.
तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर करायची. छंदापायी भरपूर सुट्या घ्यायची. 'द मिरर' रिपोर्टनुसार हे सगळं काही तिच्या वरिष्ठांना पटायचं नाही. त्यामुळे हळू हळू तिचे सगळेच वरिष्ठ सहकारी तिच्यावर जाम वैतागू लागले. कधी कधी तिला रागवायचेही. हे सगळं असह्य झालं आणि एक दिवस या पठ्ठीनं चक्क नोकरीवरच लाथ मारली. सरळ राजीनामा दिला आणि नोकरीच्या चक्रातून मुक्त झाली.. मग तिने तिच्या छंदासाठी पुर्ण वेळ देणं सुरू केलं. आवडीनुसार तिचे ट्रॅव्हलिंगचे फोटो आणि व्हिडियो ती इन्स्टाग्रामवर शेअर करू लागली. बघता बघता तिचं फॅन फाॅलोईंग (fan following) चांगलंच वाढलं आणि आज ती तिथली प्रसिद्ध इन्स्टास्टार बनली असून त्या माध्यमातून बक्कळ कमाईही करत आहे... म्हणूनच तर कुणाचं करिअर (carrier)कुठून कसं टर्न घेईल... काही सांगता येत नाही, हेच खरं..