Join us  

संजय दत्तची लेक त्रिशाला म्हणतेय, स्ट्रेच मार्क का लपवू? त्या खुणा नाहीत, माझ्या संघर्षाची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 5:39 PM

त्रिशालानं (Trishala Dutt) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. पांढऱ्या ड्रेसमधील त्रिशाला आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्सकडे (stretch marks) फाॅलोअर्सचं लक्ष वेधत आहे. या स्ट्रेच मार्क्समागे दडलेल्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टद्वारे त्रिशालानं बाॅडी पाॅझिटिव्हिटीचं (body positivity) एक उदाहरण समोर ठेवलं आहे.

ठळक मुद्देत्रिशाला म्हणते शरीरावरचे हे स्ट्रेच मार्क्स आपण एके काळी लढलेल्या लढाईची खूण आहे. स्ट्रेच मार्क्स माझे आहेत , ते मी अभिमानानं मिरवत आहे. 

जे अप्रिय आहे ते रंगीत, झगमगीत मुलाम्यामागे दडून ठेवण्याचा हा काळ. पण जेव्हा कोणी या प्रवाहाच्या विरुध्द जाऊन जे अप्रिय आहे तेच अभिमानानं मिरवतो, माझं आहे ते सांगतो  तेव्हा त्याची बातमी होते. अशीच बातमी आहे संजय दत्तची (Sanjay Dutt daughter)  लेक त्रिशाला दत्तची.. त्रिशाला दत्त  (Trishala Dutt) ही अमेरिकेत राहात असून ती मानसोपचारतज्ज्ञ आहे. ती समाज माध्यमांवर खूप सक्रीय असते. एक काळ होता जेव्हा वजन वाढलेल्या त्रिशालाचे फोटो माध्यमात प्रसिध्द होत होते. त्रिशाला आनंदी नाही हे तिच्या फोटोवरुनही कळत होतं. पण चर्चा व्हायची ती तिच्या स्थूलतेचीच. संजय दत्त सारख्या अभिनेत्याची ही मुलगी असूनही तिला आपल्या दिसण्याबाबत काहीच वाटत नसेल का? असे प्रश्न तिचे फोटो बघणाऱ्याला पडत. तीच त्रिशाला काही दिवसांपूर्वी पुन्हा चर्चेत आली ती तिच्या वेटलाॅसमुळे.  समाज माध्यमांवर फोटो टाकून त्रिशालानं आपली वेटलाॅस जर्नी (weight loss journey of Trishala Dutt) सांगितली. त्रिशालाचे हे स्लिम ट्रिम फोटो बघून तिनं आपलं वजन कसं घटवलं याचंच कुतुहल फाॅलोअर्समध्ये निर्माण झालं. ते कुतुहल शमलंही नाही तोच त्रिशालानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. पांढऱ्या ड्रेसमधील त्रिशाला आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्सकडे फाॅलोअर्सचं लक्ष वेधत आहे.  या स्ट्रेच मार्क्समागे (stretch marks)  दडलेल्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टद्वारे त्रिशालानं बाॅडी पाॅझिटिव्हिटी (body positivity) चं एक उदाहरण समोर ठेवलं आहे. 

Image: Google

त्रिशाला म्हणते , हे स्ट्रेच मार्क्स म्हणजे  माझ्या एका काळाची खूण आहे, आठवण आहे. तो काळ जेव्हा शरीर वाढत होतं आणि शरीरावरली त्वचा मात्र माझ्या शरीराच्या वाढीच्या वेगाला पुरे पडली नाही. त्यामुळे आज शरीरावर हे स्ट्रेच मार्क्स म्हणजे कायमस्वरुपीच्या खूणा म्हणून उरल्या आहेत. हे स्ट्रेच मार्क्स म्हणजे माझ्यासाठी एक आठवण आहे जेव्हा आयुष्यात आलेला एकटेपणा घालवण्यासाठी माझं शरीर त्याच्या पध्दतीनं वाट काढत होतं, ते वाढत होतं. सोबतीला पदार्थांची सोबत होती. सतत खाऊन मिळणाऱ्या आनंदात माझ्या आयुष्यातला रिकामेपणा भरुन निघत होता. पण ते क्षणभंगूर होतं. तो आनंद काही काळापुरता होता, खरंतर ही क्षणभंगूर जाणीव मला उध्वस्त करत होती.

Image: Google

त्रिशाला सांगते , तो एक काळ होता आणि हा एक काळ आहे. त्या परिस्थितीतून आपण बाहेर पडल्याचं,  बरं झाल्याचं त्रिशाला सांगते. त्रिशाला म्हणते हे स्ट्रेच मार्क्स म्हणजे आदर्श नाही, आपल्याला जे हवं होतं ते हे नाही. पण ते मला मिळाले आणि आता ते माझे आहेत. हे स्ट्रेच मार्क्स म्हणजे मी लढलेल्या लढाईची ती जखम आहे. वर्ष सरत आहेत तशी ही जखम पुसट होत आहे पण ती शरीरावर राहाणार आहे. हे स्ट्रेच मार्क्स मी अभिमानानं मिरवत  असल्याचं त्रिशाला आपल्या पोस्टमधून ठामपणे सांगत आहे.

 

आपल्या शरीरावरच्या नकोशा असलेल्या खुणांमध्ये कहाणी दडलेली असते. त्यात आपण, आपल्या शरीरानं, मनानं केलेला संघर्ष असतो. त्या संघर्षातून तरुन गेल्यानंतर ती खूण नकोशी वाटते, लपवावीशी वाटते. पण त्रिशालानं जे नकोसं होतं तेच मनापासून स्वीकारुन ते जगासमोर आत्मविश्वासानं उघड केलं आहे.  पाॅझिटीव्हिटीचा एक आदर्श त्रिशालानं आपल्या पोस्टमधून घालून दिला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसेलिब्रिटीसंजय दत्त