Join us  

दोन इंजिनिअर मित्रांनी नोकरी सोडली आणि लावला बिर्याणीचा गाडा! त्यांच्या 'इंजिनिअर्स बिर्याणी'ची व्हायरल गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 2:08 PM

इंजिनिअर होवून खाद्यपदार्थांचा गाडा सुरु करणं यात काय आलीये हुशारी? हा तर शुध्द वेडेपणा असं कोणालाही वाटेल. पण हा वेडेपणा केलाय तो रोहित सैनी आणि विशाल भारद्वाज या दोन इंजिनिअर मित्रांनी. त्यांचा हा वेडेपणा फेमस झाला हे विशेष

ठळक मुद्देरोहितला खाण्याचं आणि  स्वयंपाकाची प्रचंड आवड.विशालला नोकरी सोडून आपलं काहीतरी सुरु करायला हवं असं वाटायचं. रोहित विशालची  बिना तेलाची स्वादिष्ट बिर्याणी आणि ग्रेव्ही खवैय्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

खाण्याचं वेड, स्वयंपाकाची आवड हे सर्व आवडीच्या पातळीवर ठीक पण त्यासाठी कोणी चांगल्या पगाराची नोकरी सोडतं का? इंजिनिअर होवून खाद्यपदार्थांचा गाडा सुरु करणं यात काय आलीये हुशारी? हा तर शुध्द वेडेपणा असं कोणालाही वाटेल. पण हा वेडेपणा केलाय तो रोहित सैनी आणि विशाल भारद्वाज या दोन इंजिनिअर मित्रांनी. त्यासाठी त्यांनी हातातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली.  

Image: Google

रोहित सैनी आणि विशाल भारद्वाज हे दोघे इंजिनिअर हरियाणातील सोनीपतमध्ये एका कंपनीत काम करत होते. रोहितला खाण्याचं प्रचंड वेड. नुसतं खाण्याचं नाही तर स्वयंपाकाचीही आवड. स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग करुन विविध पदार्थ करुन पाहायला रोहितला खूप आवडायचं. या आवडीतूनच त्याने बिना तेलाची बिर्याणी आणि सोबत बिर्याणी ग्रेव्ही करुन पाहिली बिर्याणीचे विविध प्रकार तो करुन पाहू लागला. या आवडीतूनच त्याने यू ट्यूबवर 'कुकिंग विथ रोहित" नावाचं चॅनेल सुरु केलं. त्यावर तो रेसिपी टाकू लागला. या रेसिपींना लोकप्रियता मिळू लागली.   रोहित आणि विशाल दोघेही  इंजिनिअर्सआणि सोनीपतमध्ये एकाच ठिकाणी कामाला. दोघेही 9 ते 5 या रुटीन नोकरीला वैतागले होते. विशालला नोकरी सोडून आपण स्वत:चं काहीतरी सुरु करायला हवं असं वाटायचं. हा विचार त्यानं कितीतरी वेळा रोहितकडे बोलून दाखवला. रोहितलाही तो पटला. पण स्वत:चं सुरु करायचं म्हणजे काय? यावर अनेक शक्यतांचा पडताळा घेताना बिर्याणीच्या गाड्यावर दोघांचं एकमत झालं.

 

आपण इंजिनिअर असून असा खाद्यपदार्थाचा गाडा टाकणं योग्य ठरेल का? लोक काय विचार करतील? व्यवसायातल्या आर्थिक असुरक्षितता. रिस्कचं काय? असा एकही विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. रोहितला आपण बिना तेलाची जी बिर्याणी आणि बिर्याणी ग्रेव्ही तिच्या वेगळेपणावर आणि अफाट चवीवर विश्वास होता. ही बिर्याणी स्वस्तात लोकांना उपलब्ध करुन दिली तर स्वादिष्ट आणि पौष्टिक बिर्याणी म्हणून ती नक्कीच लोकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास रोहितला होता. या विश्वासाच्या आणि आवडीच्या बळावर दोघांनी उत्तर दिल्लीत माॅडेल टाऊनमध्ये 'इंजिनिअर्स बिर्याणी'चा गाडा सुरु केला.

Image: Google

चविष्ट बिर्याणी रेस्टाॅरण्टमध्ये जास्त किंमतीला उपलब्ध असते. त्याच्या निम्म्या किंमतीत रेस्टाॅरण्टपेक्षाही चविष्ट आणि पौष्टिक बिर्याणी रोहित आणि विशालनं आपल्या गाड्यावर सुरु केली.  इंजिनिअर्स बिर्याणी असा नावातच वेगळेपणा असलेल्या गाड्याकडे लोकं आकर्षित झाले आणि रोहित विशालच्या बिर्याणीची मागणी वाढली. 

रोहित विशालच्या बिर्याणीच्या चवीची चर्चा सोशल मीडियात पसरली तशीच हा व्यवसाय सुरु करण्याची गोष्टही फेमस झाली.  नोकरी सोडून प्रत्येकानं असा व्यवसाय सुरु करावा हा संदेश आपण इतरांना नक्कीच देणार नाही. पण आवड असेल, इच्छा असेल तर तिचा आदर करत पाऊल उचलल्यास फायदाच होतो असं रोहित आणि विशाल सांगतात.  हाॅटेल/ रेस्टाॅरण्टच्या निम्म्या किंमतीत बिर्याणी विकणाऱ्या रोहित आणि विशालनं सध्या व्यवसाय हा ना नफा ना तोट्याच्या सुत्रावर करायचा ठरवला आहे.  

Image: Google

रोहित स्वत: गाड्यावर बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार करतो तर विशाल भारद्वाज व्यवसायाशी निगडित इतर सर्व गोष्टी सांभाळतो. या दोघांनी काम करताना शिक्षणापेक्षा आवड किती महत्वाची असते  हे स्वत्:च्या उदाहरणातून दाखवून देऊन आदर्श निर्माण केला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न