मोबाईल हा सध्या सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झाला आहे. मोठ्यांबरोबरच लहानग्यांच्या हातातही सतत असणारा हा मोबाईल दैनंदिन गरज झाला आहे. हल्ली शाळा ऑनलाईन असल्याने कधी कार्टून, कधी गेम नाहीतर आणखी कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो. कोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती पाहता ही अवस्था आणखीनच अवघड झाली आहे. एकीकडे मोबाईल सतत हाताळण्याने कधी आपटून तर कधी पाण्यात पडून तो खराब होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तो चांगला नसल्याने मुलांनी मोबाईल वापरु नये असे वारंवार सांगितले जाते. पण तरीही हे सगळे सांभाळताना पालकांची तारांबळ होतेच.
आता हे सगळे ठिक असले तरी मोबाईलच्या वापरामुळे काय परिणाम होऊ शकतात याचे एक भन्नाट उदाहरण नुकतेच घ़डले आहे. तर या घटनेमुळे एका लहानग्याच्या पालकांना भलताच आर्थिक फटका बसला आहे. न्यू जर्सीमधील एका २२ महिन्यांच्या बाळाने आपल्या आईचा मोबाईल हाताळत असताना चक्क ऑनलाइन फर्निचर ऑर्डर केले. विशेष म्हणजे या फर्निचरची रक्कम थोडीथोडकी नाही तर तब्बल २ हजार डॉलर म्हणजेच १.४ लाख रुपये होती. आपल्या फोनवर वॉलमार्टची वेबसाइट सर्च केल्यानंतर मधू यांनी काही सामान आपल्या कार्टमध्ये टाकून ठेवले होते. तर मोबाईल हाताळत असताना अयांश याच्याकडून हे सगळे सामान थेट खरेदी केले गेले.
आपल्या नवीन घरासाठी काही वस्तू घेण्याचे मधू यांचे नियोजन होते. मात्र या मुलाकडून ते सगळेच खरेदी केले गेले. आमच्या मुलाने असे काही केले आहे यावर विश्वास ठेवणे खरंच अवघड आहे असे अयांशचे वडील प्रमोद कुमार म्हणाले. त्यांच्या घरच्या पत्त्यावर अचानक एकावर एक फर्निचरच्या बॉक्सची डिलिव्हरी यायला लागल्यानंतर ते एकदम चाट पडले. काही बॉक्स तर त्यांच्या घराच्या आतही येणार नाहीत इतके मोठे होते. त्यानंतर मधू यांनी आपले वॉलमार्ट अकाऊंट तपासले. त्यावेळी त्यावरुन त्यांना आवश्यक नसलेल्या खुर्च्या, फ्लॉवर स्टँड आणि अशा असंख्य गोष्टी ऑर्डर केल्या गेल्याचे समजले. तो किती लहान आणि किती क्यूट आहे, त्यामुळे त्यानी हे सगळे ऑर्डर केले आहे समजल्यावर आम्हाला हसू आवरेना असे त्या म्हणाल्या. इथून पुढे आम्ही आमच्या फोनला पासकोड आणि फेस रेकग्निशन सुरू करणार असल्याचे अयांशचे वडील प्रमोद यांनी सांगितले. त्यामुळे तुमचीही लहान मुले अशाप्रकारे फोन हाताळत असलीतल आणि त्यावर तुमचे काही व्यवहार असतील तर वेळीच सावध व्हायला हवे हे लक्षात घ्या.