उखाण्याला आपल्याकडे खूप महत्त्व असते. लग्नाकार्यात किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला लावले जातात. एकमेकांचे नाव घेणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. बरेच जण जुने झालेले तेच तेच उखाणे घेतात पण ज्यांच्याकडे कलात्मकता असते ते नव्याने उखाणे रचतात आणि त्यात आपल्या जोडीदाराचे नाव घालतात. प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे काही जणांकडे खास स्कील असते. पूर्वीच्या काळी मोठेच्या मोठे उखाणे घेण्याची पद्धत होती. आता मात्र आताच्या काळाशी निगडीत असे हटके उखाणे घेण्याला तरुणांकडून पसंती दिली जाते. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींनी घेतलेले उखाणे बरेच व्हायरल होतात (Ukhana video by aaji old lady social viral).
नुकताच एका मराठमोळ्या आजींनी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय गावरान भाषेत पण तितक्याच निर्मळपणे त्यांनी घेतलेला उखाणा ऐकून आपल्यालाही हसू आल्याशिवाय राहत नाही. चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असलेल्या या आजींचे वयही ७० ते ८० च्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. गुलाबी रंगाची सुती साडी, कपाळावर लाल मोठं कुंकू लावलेल्या या आजीबाई दिसत आहेत. प्रशिस शिरसाट या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा उखाण्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आजींनी अतिशय अनोखा उखाणा घेतला आहे.
" इंग्रजीत टोमॅटोला म्हणतात टो टो...पाटलाच्या हातामध्ये इंद्राबाईचा फोटो" म्हणजे या आजीबाईंचे नाव इंद्रा पाटील असल्याचे समजते. तसेच टोमॅटोचा मधला मॅ गाळून त्यांनी फॅन्सी पद्धतीने टोमॅटो म्हणण्याचा प्रयत्न केल्याने ते खूपच गमतीशीर वाटत आहे. हा उखाणा घेतानाचा आजीबाईंचा जोश आणि उत्साह कौतुकास्पद आहे. या वयातही नवऱ्याचे नाव घेताना त्यांच्या चेहऱ्यावर येणारे भाव आणि त्यांनी केलेली शब्दांची जुळवाजुळव पाहून आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या या व्हिडिओला बरेच लाईक्स आले असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आजीबाईंचे कौतुक केले आहे.