ही गोष्ट आहे एका आंदोलनाची. इटलीमधे रविवारी 50 एअर हॉस्टेस ( हवाई सुंदरी) यांनी आपल्या मागण्यांसाठी आणि कंपनीच्या नियमांचा, भूमिकेचा निषेध म्हणून जगावेगळं आंदोलन केलं. या 50 एअर हॉस्टेसनी आपल्या आंदोलनानं जगभरातल्या माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याला कारण म्हणजे या आंदोलनादरम्यान या एअर हॉस्टेसने घेतलेली भूमिका.
Image: Google
नवीन एअर लाइन्समधील नियमांच्या आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात 50 एअर हॉस्टेसने इटलीतल्या केम्पीडोग्लियोतल्या रोम टाऊन हॉलच्या चौकात आंदोलन केलं. या चौकाचं विशेष म्हणजे हा चौक मायकेल एंजेलो यांनी डिझाइन केलेला आहे. या चौकात 50 एअर हॉस्टेस एकत्र आल्या. त्या एका रांगेत उभ्या राहिल्या. तोंडातून एक शब्दही न उच्चारता त्यांनी खांद्यावरची बॅग खाली ठेवली. मग ओव्हरकोट काढला, जॅकेट काढलं आणि स्कर्ट काढून त्या आपल्या आतल्या कपड्यांवर भर चौकात शांतपणे उभ्या राहिल्या. आंदोलनादरम्यान एअर होस्टेसने घेतलेल्या या भूमिकेने तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी शरमेनं मान खाली घातली. आणि जगभरात या आंदोलनाची बातमी व्हायरल झाली.
50 एअर हॉस्टेसने एकदम टोकाची भूमिका का घेतली? याला कारण नवीन कंपनीतलं नवीन व्यवस्थापन. या 50 एअर हॉस्टेस एलिटालिया या एअर लाइन्स कंपनीत काम करत होत्या. या कंपनीला आईटीए एयरवेजनं नुकतंच ताब्यात घेतलं. पूर्वीच्या एलिटालिया कंपनीत 10 हजार 500 कर्मचारी काम करत होते. आता आईटीए एअरवेजमधे केवळ 2,600 कर्मचार्यांनाच नोकरी मिळाली. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. तसेच जुन्या कंपनीतील जे कर्मचारी आईटीए एअरवेजमधे काम करतात त्या कर्मचार्यांना त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार पदं मिळाली नाहीत, ज्यांचं जुन्या कंपनीत प्रमोशन होणार होतं ते रोखलं, शिवाय वेतन कपातही करण्यात आली. शिवाय कामाची खात्री नाही. व्यवस्थापन तुमची नोकरी कन्फर्म आहे हे सांगायलाही तयार नाही. नोकरी आह आहे आणि उद्या नाही या अवस्थेने अस्वस्थ झालेल्या या कर्मचार्यांपैकीच या 50 एअर हॉस्टेस आहेत . त्यांनी कंपनीच्या धोरणांचा, त्यांच्यावर व्यवस्थापनाकडून होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून कपडे काढून आंदोलन करण्याचा मार्ग निवडला.
Image: Google
आपली मागणी मान्य होण्यासाठी या 50 एअर हॉस्टेसने केलेल्या आंदोलनाची दखल जगभरात घेतली गेली. तशीच ती जिच्याविरुध्द हे आंदोलन सुरु आहे त्या आईटीए या एअरवेज कंपनीनेही घेतली . मात्र एअर हॉस्टेसने केलेल्या या आंदोलनावर व्यवस्थापनानं आक्षेप घेतला आहे. हे आंदोलन जर सुरु राहिलं तर आंदोलन करणार्या एअर हॉस्टेसना कारवाईला सामोरं जावं लागेल असं आईटीए एअरवेज कंपनीच्या व्यवस्थापनानं म्हटलं आहे.
Image: Google
आपल्या कष्टांवर आधीची कंपनी मोठी झाली. ती कंपनी आईटीएने ताब्यात घेतली. पण मग आमच्या कष्टांचं काय? त्यांना न्याय कोण देणार? असं म्हणत या 50 एअर हॉस्टेसने केलेल्या आंदोलनाला खरंच न्याय मिळेल की या आंदोलनाची केवळ चर्चाच होईल?