Join us  

महिलांसाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी दिली खास भेट, महिलांना बचतीवर जास्त व्याज देणारी विशेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 12:35 PM

Union Budget 2023 Special Scheme for Women : ‘महिला सन्मान बचत पत्र’ ही खास योजना जाहीर

ठळक मुद्देघरातील पुरुषांनी महिलांच्या नावाने मुदत ठेव करण्यासाठी ही योजना प्रोत्साहन देणारी आहे.  महिलांना सर्व बँकांमध्ये येत्या २ वर्षासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ यांना या अर्थसंकल्पातून कोणकोणत्या प्रकारचे लाभ होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. केंद्रातील मोदी सरकारने आज संसदेत १० वा बजेट सादर केला. यंदा भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना हे निमित्त साधून अर्थमंत्र्यांनी महिला वर्गासाठी ‘महिला सन्मान बचत पत्र’ ही खास योजना जाहीर केली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आली (Union Budget 2023 Special Scheme for Women). 

या योजनेअंतर्गत कोणतीही महिला अथवा तरुणी दोन वर्षासाठी दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम मुदत ठेव म्हणून गुंतवू शकते. या योजनेअंतर्गत त्या महिलेला किंवा तरुणीला गुंतवलेल्या रकमेवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. ही योजना मार्च २०२५ सालापर्यंत चालू राहणार आहे. शिवाय या योजनेत गुंतवलेली अल्प रक्कम मुदतीआधी काढून घेण्याची सुविधा यात ठेवण्यात आली असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार विशेष संवेदनशील असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महिलांना सर्व बँकांमध्ये येत्या २ वर्षासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

आता ही योजना खरंच महिलांना फायदेशीर ठरणार की नाही, याबाबत प्रसिद्ध अर्थ विषयाचे अभ्यासक अजित जोशी यांना विचारले. ते म्हणाले, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  ही योजना जाहीर केली असली तरी त्यामुळे खूप मोठा फायदा होईल असे म्हणता येणार नाही. सध्या काही बँकांमध्ये मुदत ठेवीसाठी ६.३० टक्के  व्याजदर दिला जातो. त्यामध्ये फारतर अर्धा किंवा १ टक्क्याचा फरक पडणार आहे. अशाप्रकारे महिलांसाठी असणारी ही विशेष घोषणा असली तरी ही योजना खूप फायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही. मात्र घरातील पुरुषांनी महिलांच्या नावाने मुदत ठेव करण्यासाठी ही योजना प्रोत्साहन देणारी आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरलअर्थसंकल्प 2023