माधुरी पेठकर
ही गोष्ट एका आईची. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तिने घेतलेल्या एका निर्णयाचं भावनिक ओझं मात्र तिला रोज अस्वस्थ करतं. कुणाही आईसाठी मूल हे तिचं विश्व असतं. आई झाल्यानंतर सारं आयुष्यच बदलतं. मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं, त्यांना काही कमी पडू न देणं यासाठी आई जिवाचं रान करते. जगातली कोणतीही आई याला अपवाद नाही. मात्र ३२ वर्षीय हनाह मार्टिनची गोष्ट जरा वेगळी आहे.
हनाह आपल्या तीन मुलांसह पेन्सिलवेनिया येथे राहते. तिन्ही मुलांचा सांभाळ ती एकटीच करते. या तिघांच्या जबाबदारीत तिचा दिवस कुठे उगवतो आणि कुठे मावळतो हे तिला समजतही नाही; पण आजही तिला तिच्या आणखी दोन मुलांची आठवण होते. हनाहला खरं तर पाच मुलं; पण पहिली दोन मुलं आज तिच्याजवळ नाहीत. ती झाली तेव्हा हनाहची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. १९ वर्षांची असताना हनाहला तिच्या मित्रासोबतच्या नात्यातून मुलगी झाली. ॲड्रिअना हे तिचं नाव. ती अवघ्या दीड महिन्याची असताना त्या मित्राने तिचं पालकत्व नाकारलं. हनाहला त्या परिस्थितीत मुलीला एकटीनं सांभाळणं अशक्य झालं. आपल्या मुलीचे हाल होऊ नये म्हणून तिने आपली मुलगी दत्तक दिली. पुन्हा दोन वर्षानंतर जेव्हा तिला मुलगा झाला. तेव्हाही पुन्हा हनाहवर तीच परिस्थिती ओढावली. तिने त्यालाही दत्तक दिले.
आज हनाहकडे दोघांचे साधे फोटोदेखील नाही.
तिनं तिची ही गोष्ट जगाला सांगितली तेव्हा अनेकांनी तिला दोष दिला, नावंही ठेवली. पण मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण हा निर्णय घेतला असं ती सांगते.
कुमारी मातांचे प्रश्न, मुलांच्या भवितव्याचे प्रश्न गंभीर आहे. हनाहने आपबिती मांडल्यावर अनेकांनी नावं ठेवली, पण काहींना तिच्याविषयी हळहळही वाटली. मायलेकरांची ताटातूट झाली ती कायमचीच.