आपल्याला एखाद्या नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळावी असे अनेकांना वाटते. चांगली नोकरी मिळाली तर चांगले पद मिळेल, भरपूर पगार मिळेल आणि आपण आनंदात राहू शकू अशी स्वप्न आपण सगळेच पाहतो. पण नोकरी मिळवताना मात्र आपली तारांबळ उडते. मुलाखतीला जाताना आपले कपडे काय असावेत, आपण कोणत्या गोष्टींची तयारी करायला हवी, आपला सीव्ही म्हणजेच रिझ्युम कसा असावा असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण एका महिलेने तर नोकरी मिळण्यासाठी काय शक्कल लढवली हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
तर या महिलेने सीव्ही पाठवताना तो साधासुधा न पाठवता थेट मोठ्या केकवर प्रिंट करुन पाठवला. कार्ली पावलिनैक ब्लैकबर्न (Karly Pavlinac Blackburn) असे या महिलेचे नाव असून Nike या प्रसिद्ध कंपनीला तिने अशाप्रकारचा रिझ्युम छापलेला केक पाठवला. कार्लीने याबाबतचे फोटो आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली. विशेष म्हणजे Nike कंपनीमध्ये आता कोणत्याही प्रकारची भरती सुरू नसून कंपनीला आपल्याबाबतची माहिती मिळावी यासाठी आपण हे केल्याचे कार्ली यांनी सांगितले.
कंपनीमध्ये काही कारणाने एक मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आपला केक जायला हवा या विचाराने कार्लीने असे केले. तिने कार्यक्रमाच्या बाबतीतली माहिती घेऊन आपला रिझ्युम प्रिंट केलेला खास केक तयार करुन घेतला आणि या कार्यक्रमात पाठवला. हा केक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेल यासाठी तिने अतिशय परफेक्ट असे आयोजनही केले. त्यामुळे केक परफेक्ट संबंधित पार्टीमध्ये पोहोचला आणि कदाचित पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्यांनी त्याचा आस्वादही घेतला असावा. आता इतके सगळे केल्यावर या महिलेला कंपनीमध्ये नोकरी मिळाली की नाही याबाबत मात्र अद्याप काही समजू शकले नाही.