९ महिने आपल्या शरीरात एक जीव वाढवून त्याला जन्म द्यायचा ही वाटते तितकी सोपी प्रक्रिया नक्कीच नाही. निसर्गाने महिलांना दिलेली ही देणगी तिच्यातील शक्ती किंवा विशेषत्त्व दाखवणारी आहे. एखादी महिला एकावेळी २ मुलांना जन्म देणार म्हटले की आपल्याला साहजिकच त्या महिलेला जुळे होणार असे वाटते. हे जरी बरोबर असले तरी नुकतीच एक चमत्कारीक अशी गोष्ट समोर आली आहे. एका महिलेला जन्मत:च २ गर्भाशये असून या दोन्ही वेगळ्या गर्भाशयात २ स्वतंत्र गर्भ वाढत आहेत. कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या केल्सी हॅचर हिला जुळे होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ती आणि तिचा पती अतिशय खूश होते. पण या स्टोरीतील खरा ट्विस्ट त्यांनाही नंतर कळाला, तो म्हणजे २ महिन्यानंतर केल्सी हिची अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केल्यानंतर तिला २ गर्भाशये असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. केल्सी हिला याआधी ३ मुलं असून आता ती नव्याने २ बाळांना जन्म देणार आहे (US Women with rare double uterus expecting babies in both Kelsey Hatcher)
एकाच महिलेला २ गर्भाशये कशी काय?
केल्सी आणि तिचा पती जुळे होणार म्हटल्यावर काहीसे आश्चर्यचकीत झाले होते. त्यानंतर सोनोग्राफीमधून तिची २ बाळं वेगवेगळ्या गर्भाशयात वाढत असल्याचे समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. केल्सी १७ वर्षांची होती तेव्हा तिला २ गर्भाशये असल्याचे लक्षात आले होते. मात्र पहिल्या तिन्ही बाळंतपणात तिला एकावेळी १ च गर्भधारणा झाली. मात्र आता तिला २ गर्भाशयांमध्ये २ वेगळ्या गर्भधारणा झाल्याचे समजले. अशा प्रकारची घटना अतिशय दुर्मिळ असून १० लाखांतून एखाद्या महिलेला अशाप्रकारे २ गर्भाशये असण्याची आणि त्यात गर्भधारणा होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशाप्रकारची गर्भधारणा काही प्रमाणात चिंतेची बाब असू शकते असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. याआधी अशाप्रकारे २ वेगळ्या गर्भाशयांमध्ये गर्भधारणा कोणत्या महिलेला झाल्या आहेत का याबाबत माहिती घेतली असता आतापर्यंत केवळ २ च महिलांना अशाप्रकारे गर्भधारणा झाल्याचे केल्सी हिला समजले. केल्सी हिचे वय आता ३२ असून अद्याप तरी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. मात्र भविष्यात ही गर्भधारणा कशी होते हे पाहणे सगळ्यांसाठीच उत्सुकतेचे होणार आहे. महिने भरत जातील तशी स्थिती जास्त स्पष्ट होत जाईल असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.