हॉटेलमध्ये जाणे आपल्या सगळ्यांसाठीच अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. घरी स्वयंपाकाचा कंटाळा आणि किंवा वेगळं काही खावंसं वाटलं की आपण अगदी सहज हॉटेलमध्ये जातो. इतकंच नाही तर ऑफीसच्या कामानिमित्त किंवा मित्रमंडळींना, आणखी कोणाला भेटायचे असेल तरी आजकाल घरी भेटण्यापेक्षा हॉटेलमध्ये भेटणेच पसंत केले जाते. आपण हॉटेलमध्ये आधी गेलो आणि आपल्या सोबतची मंडळी आलेली नसतील तर आपण टेबल पकडतो आणि मोबाइलमध्ये काही ना काही करत बसतो. फोनवर गप्पा मारणे, गाणी ऐकणे किंवा आणखी काही करणे असे बसल्या बसल्या केले जाते. यामुळे आपला वेळ वाया न जाता तो सत्कारणी लागतो. इतकेच नाही तर अनेकदा आपण सगळे एकत्र भेटलो तरी प्रत्येकाची तोंड काही वेळाने नकळत मोबाइलमध्ये जातात. हे लक्षात घेऊनच एका हॉटेलने आपल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये मोबाइल वापरण्यास बंदी केली आहे (Using Mobile Phone is Banned in Hotel).
जपानची राजधानी टोकियोमधील डेबू चान नावाच्या रेस्टरॉमध्ये हा अनोखा नियम करण्यात आला आहे. रामेन नूडल्स मिळणाऱ्या या हॉटेलमध्ये पटापट खाऊन टेबल रीकामे करण्यासाठी हा नियम केल्याचे समजते. या रेस्तरॉमध्ये रामेन नूडल्स खाण्यासाठी खूप गर्दी होते. त्यामुळे ग्राहकांना कायमच जागा मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. हॉटेलमध्ये खात असलेल्या ग्राहकांचे लवकर खाऊन व्हावे आणि इतरांना जागा मिळावी या हेतूने हा अनोखा नियम करण्यात आला आहे. बरेचदा लोक रामेन गार होईपर्यंत फोनवर वेळ घालवत राहतात. मोबाइल पाहत खाणे ही आता अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळेच मोबाईल पाहत खातात. पण त्याचा शरीरावर, मनावर वाईट परीणाम होतो.
या रेस्तरॉचे मालक कोटा काई म्हणाले, आपल्याकडे हकाटा रामेन मिळते. हे १ किलोमीटर रुंदीचे असते. पातळ असल्याने ती लवकर स्ट्रेच होते. नूडल्स पातळ असतील तर ते लवकर खराब होतात त्यामुळे ते वेळेत खावे लागतात, तरच ते चांगले लागतात. तसेच नूडल्स आल्यावरही ग्राहक फोन पाहत बसले तर वेळही वाया जातो. त्यामुळे ३० सीट असलेले या रेस्तरॉमध्ये मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना समोर आलेले अन्न चांगले असतानाच खाता येईल आणि सगळ्यांच्याच वेळेची बचत होईल. मात्र अशाप्रकारे अनोखा नियम करणाऱ्या या हॉटेलबाबत ग्राहकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.